लाचखोर तहसीलदार मीनल दळवी यांच्याकडे सापडले काेट्यवधींचे घबाड

अलिबागच्या लाचखाेर तहसीलदार मीनल दळवी यांच्या मुंबई- विक्राेळी येथील घरातून एक काेटी रुपयांची राेख रक्कम तसेच काही महत्वाचे दस्ताऐवज तपास यंत्रणेच्या हाताला लागले आहेत.

    अलिबाग : अलिबागच्या लाचखाेर तहसीलदार मीनल दळवी यांच्या मुंबई- विक्राेळी येथील घरातून एक काेटी रुपयांची राेख रक्कम तसेच काही महत्वाचे दस्ताऐवज तपास यंत्रणेच्या हाताला लागले आहेत. तसेच अलिबाग येथील घरातून सुमारे ६० ताेळे साेन्याचे दागीने सापडले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक नवी मुंबई विभागाच्या पाेलीस अधिक्षक ज्याेती देशमुख यांनी नवराष्ट्रशी बाेलताना दिली.

    तहसीलदार मीनल दळवी यांना दाेन लाख रुपयांच्या लाचे प्रकरणी नवी मुंबईच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक करुन आज अलिबागच्या विशेष सत्र न्यायालयात हजर केले. दळवी यांच्यासह त्यांचा एजंट राकेश चव्हाण हा देखील होता. न्यायालयाने दाेघांचीही दाेन दिवसांसाठी पाेलीस काेठडीत रवानगी केली आहे.

    अलिबागमधील रोहन खोत यांच्या नातेवाईकांच्या कोळगाव येथील जमिनीच्या बक्षिस पत्राचे नोंदणी करण्याचे प्रकरण तहसीलदार कार्यालयाकडे दाखल झाले होते. या बक्षिसपत्राच्या नोंदीसाठी रोहन खोत यांच्याकडे तहसीलदार मीनल दळवी यांनी तीन लाखांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती दाेन लाख देण्याचे ठरले होते. दळवी यांचा एजंट राकेश चव्हाण याच्याकडे पैसे देण्यास दळवी यांनी सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी खोत यांच्याकडून दोन लाख रुपये स्वीकारताना पथकाने राकेश चव्हाण याला रंगेहाथ पकडले. यावेळी त्याने तहसीलदार दळवी यांचे नाव सांगितल्याने पथकाने तहसीलदारांना गोंधळपाड्यातील निवासस्थानातून ताब्यात घेतले. या अचानकपणे घडलेल्या कारवाईने मीनल दळवी यांना धक्काच बसला. त्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

    आज मीनल दळवी यांना त्यांच्या साथीदारासह न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र सकाळपासून दळवी यांना पुन्हा चक्कर येत असल्याने न्यायालयात हजर करण्यास उशीर झाला. अखेर दुपारी दीड वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रुग्णालयातून अलिबाग पोलीस ठाण्यात दोघाही लाचखोरांना आणले. तिथे अटकेची नोंद केल्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण करीत न्यायालयात हजर करण्यात आले. शनिवारी सुट्टी असतानाही विशेष सत्र न्यायाधीश भिंगारे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी जिल्हा सरकारी वकील ॲड. भूषण साळवी यांनी अधिक चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश अशाेक भिलारे यांनी दोघांची सोमवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

    दरम्यान, दळवी यांच्या मुंबूई-विक्राेळी येथील घरातून तब्बल एक काेटी रुपयांची राेख रक्कम सापडली आहे. या ठिकाणी मुंबईतील पथकाने कारवाई केली तर अलिबाग येथे रायगड पथकाने छापा टाकला. अलिबागच्या घरातून सुमारे ६० ताेळे साेने तपास यंत्रणांना सापडले आहे. मुंबई-विक्राेळी येथील घरातून काही महत्वाचे दस्ताऐवज सापडले आहेत. त्यानुसार दळवी यांची अन्य काेठे मालमत्ता आहे का तसेच अन्य कोणत्या ठिकाणी अशाच प्रकारची माया जमवली आहे का याचा शाेध तपास यंत्रणा घेत आहेत, असेही पाेलीस अधीक्षक ज्योती देशमुख यांनी स्पष्ट केले.

    सरकारी अधिकारी अथवा कर्मचारी अशा प्रकारे नागरिकांकडे लाचेची मागणी करत असतील तर, नागरिकांनी न घाबरता याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करावी, असे आवाहनही देशमुख यांनी केले.