ग्रामपंचायतीत लाखोंचा व्यवहार; पण कागदांवर सरपंचाची स्वाक्षरीच नाही!

    गडचिरोली (Gadchiroli) :  जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात समाविष्ट सुंदरनगर ग्रामपंचायत येथे १६ नोव्हेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षांनी ग्रामसभेचे आयोजन झाल्याने नागरिकांची एकच गर्दी दिसून आली. या ग्रामसभेत १५ वित्त आयोगाच्या निधीतून आणि कोविड-१९ च्या निधीतून अव्वाच्या सव्वा दराने साहित्य खरेदी केल्याचे दिसून येताच नागरिकांनी ग्रामसभेत एकच राडा करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

    गडचिरोली जिल्ह्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूका करोनामुळे थांबविण्यात आले होते. मे २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत जवळपास ९ महिन्याच्या कालावधीत प्रशासकाकडे कारभार होता. १४ वित्त व १५ वित्त आयोगाची निधी आणि कोविड निधी तसेच आदी निधीतून मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी करून निधी संपविण्यात आली. ग्रामपंचायतीची बॉडी बसल्यावरही काही निधीचा विल्हेवाट लावण्यात आला. जून महिन्यातही रोकड वहीत लाखोंचा व्यवहार दिसून आला. मात्र, सरपंचाची स्वाक्षरी नसल्याने एकच गोंधळ उडाला.

    येथील सचिव पिना घुगलोत यांनी थातुरमातुर सहभाग घेऊन ग्रामसभा गुंडाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहा गावातील नागरिकांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. कचरा वाहून नेण्यासाठी ग्रामपंचायतीने तब्बल २ लाख रुपये खर्च करून घंटा गाडी घेतली तर ४ लाख ८० हजार रुपये खर्च करून ३ हायमास्ट खरेदी केली. ज्यांचा बाजारभाव कमी आहे. आणखी किती निधी कुठे खर्च केली सविस्तर माहिती दिल्याशिवाय ठराव मंजूर करणार नसल्याचा नागरिकांनी ठाम निर्णय घेतला.

    सायंकाळ झाल्याने विषय पूर्ण होऊ शकले नाही त्यामुळे नागरिकांनी दुसरा दिवस ठरविण्याची मागणी केली. एकंदरीत सुंदरनगर ग्रामपंचायत मध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली.