छगन भुजबळांनी  सांगितले राजीनामा जाहीर केल्याचे खरे कारण; म्हणाले…

ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आपला राजीनामा दिल्याचे सांगितल्याने राज्यभरात गदारोळ निर्माण झाला. आता माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी राजीनामा देण्यामागचे खरे कारण सांगितले आहे.

    मुंबई : ओबीसी (OBC Reservation) समाजाच्या आरक्षणासाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) भक्कम भूमिका घेतल्यानंतर राजकारणामध्ये वादंग निर्माण झाला. सत्तेमध्ये असून देखील सरकार विरोधी भूमिका घेत असल्यामुळे विरोधकांनी भुजबळांवर निशाणा साधला. दरम्यान, ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आपला राजीनामा (Chhagan Bhujbal Resignation) दिल्याचे सांगितल्याने राज्यभरात गदारोळ निर्माण झाला. आता माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी राजीनामा देण्यामागचे खरे कारण सांगितले आहे.

    माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “कोणत्याही पक्षाने माझा राजीनामा मागितला नव्हता. पण मला वाटत होतं की मी तिथे (ओबीसी एल्गार सभेला) जातोय, तर मला सरकारविरोधात बोलावं लागेल. त्यामुळे मी राजीनामा दिला. परंतु, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणाले की राजीनामा दिल्याची गोष्ट बाहेर सांगू नका. म्हणून मी पावणे तीन महिने काहीच बोललो नाही. विरोधकांनी टीका केली तरी मी गप्प बसलो. पण सरकार पक्षातील एक आमदार म्हणाला की भुजबळला लाथ मारून बाहेर काढा. लाथा मारायची भाषा ऐकली तेव्हा मी म्हणालो की राजीनामा दिल्याचं आता नाही सांगणार तर कधी सांगणार? सरकारमधील आमदार म्हणत होते की यांना लाथाडा आणि बाहेर काढा. आणि मी काही बोललो नसतो तर म्हणाले असते किती बेशरम माणूस आहे की खुर्चीला चिकटून बसला आहे. कोणी मला लाथ मारण्याची गरज नाही. त्यामुळे मी म्हणालो की राजीनामा दिला आहे, जा जाऊन तो स्वीकारा”, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या राजीनाम्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

    खोट्या दाखल्यांवर कुणबी लिहिलं जात आहे

    मराठा समाज शक्तीशाली लोक आहे. त्यांच्यात गरिबी आहे. पण गरिबी कुठे नाही? मला आरक्षण असताना मी आरक्षण घेतलं नाही. मी खूपपूर्वी सवलत घेतली होती. पण मी आणि माझ्या मुलांनी आरक्षण घेतलं नाही. पण तरीही मी लढतोय. कारण, ओबीसी समाजातील ५४ टक्के लोक शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांना जरा पाठिंबा मिळाला तर ते इंजिनिअर, डॉक्टर बनतात आणि कुटुंबाला पुढे नेतात. पण आता सगळं संपतंय. खोट्या दाखल्यांवर कुणबी लिहिले जात आहेत. ते कुणबी झाले तर ते ओबीसी बनतील. त्यामुळे, आम्ही काय म्हणतोय त्यांना वेगळं आरक्षण द्या. पण हे मागच्या दाराने येत आहेत.