संजय राऊत हे एक दलाल, ते स्वतःला शिवसेनाप्रमुख समजायला लागलेत; दादा भुसे यांचा सणसणीत टोला

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माझ्यावर केलेल्या खोट्या आरोपांना मी या आधीच सभागृहात व प्रसार माध्यमातून उत्तर दिलेले आहे. याप्रकरणी आम्ही मालेगाव न्यायालयात दाद मागितली आहे. याप्रकरणी राऊत यांना मालेगाव न्यायालयात जामीन घेण्यासाठी यावे लागले हे त्यांनी विसरू नये.

    मालेगाव : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माझ्यावर केलेल्या खोट्या आरोपांना मी या आधीच सभागृहात व प्रसार माध्यमातून उत्तर दिलेले आहे. याप्रकरणी आम्ही मालेगाव न्यायालयात दाद मागितली आहे. याप्रकरणी राऊत यांना मालेगाव न्यायालयात जामीन घेण्यासाठी यावे लागले हे त्यांनी विसरू नये. ते कोणी स्वांतत्र्यसैनिक नाहीत, असा टोला पालकमंत्री दादा भुसे यांनी खासदार राऊत यांना लगावला.

    ठाकरे गटाचे नेते खासदार राऊत यांनी मंत्री भुसे यांच्यावर गिसाका प्रकरणी १७८ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी मंत्री भुसे यांनी मालेगाव न्यायालयात मानहानीचा दावा केला असून, या प्रकरणी खासदार राऊत काल शनिवारी मालेगाव न्यायालयात हजर झाले होते. यावेळी राऊत यांनी केलेल्या आरोपांना भुसे यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी मनोहर बच्छाव, विनोद वाघ, प्रमोद पाटील, सतीश पाटील, यशपाल बागुल आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

    भुसे म्हणाले, गिसाका प्रकरणी राऊत यांना एक दिवस मालेगावची माफी मागावीच लागेल. राऊत हे काही स्वातंत्र्य सैनिक नाहीत. ते मालेगाव न्यायालयात जामीन घेण्यासाठी आलेले होते. त्यांनी माझ्यावर जे काही आरोप केले आहेत. त्याला मी या आधीच उत्तर दिलेले आहे. तर हिरे यांना ज्या कारागृहात व कोठडीत ठेवले आहे. त्याच कारागृहात व कोठडीत पालकमंत्र्यांना ठेवणार या राऊत यांच्या टिकेला उत्तर देताना भुसे यांनी ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असा टोमणा मारला.

    खा. राऊत हे एक दलाल असून, ते स्वतःला शिवसेना प्रमुख समजायला लागले आहेत. त्यांच्या मनामध्ये वेगळी स्वप्न आहेत. राऊत यांना असं वाटतं की, मी शिवसेना पक्षप्रमुख होईल. मीठ शिवसेनेचं खायचं, दलाली मात्र राष्ट्रवादीची करायची. त्यांना असं वाटत की माझी मुख्यमंत्रिपदी लॉटरी लागले. पण जो दुसऱ्यासाठी खड्डे खोदतो, तो स्वतःच त्यात जातो. हा आजवरचा अनुभव आहे, असेही भुसे यांनी म्हटले आहे.