मंत्री केसरकर यांच्यावर जेवढी जहरी टीका कराल तेवढेच ते विजयी घोडदौड करतील!

विरोधकांनी अज्ञातांकरवी बॅनरबाजी करण्यापेक्षा केसरकर यांच्या साथीने चर्चा करून त्यांचे हात बळकट केल्यास विरोधक औषधालाही शिल्लक राहणार नाहीत, असे वक्तव्य रुपेश पावसकर यांनी केले आहे.

    मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका करून सूर्यावर थुंकण्यापेक्षा जे कोणी अज्ञात बॅनरबाजी करतात त्यांना अन्य लोकप्रतिनिधींनी आपल्याला निवडले आहे याचे भान असावे, असा टोला जिल्हा शिवसेना मुख्य संघटक रुपेश पावसकर यांनी लगावला आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्यटन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. त्यांनी निवती झुलता पूल, वेंगुर्ला झुलता पूल, चांदा ते बांदा योजना, सिंधुरत्न समृद्धी योजना, ट्रान्सफॉर्मर, रस्ते, रुग्णवाहिका, जलपर्यटन, क्रीडा स्पर्धा आदी विकासात्मक कामांना चालना दिली आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांच्यावर जेवढी जहरी टीका कराल तेवढेच ते विजयी घोडदौड करतील यात तीळमात्र शंका नाही. दीपक केसरकर यांनी जेवढा विकासनिधी आणून खर्च केला तेवढा कोणत्या लोकप्रतिनीधींनी केला ते जाहीर करावे. त्यामुळे विरोधकांनी अज्ञातांकरवी बॅनरबाजी करण्यापेक्षा केसरकर यांच्या साथीने चर्चा करून त्यांचे हात बळकट केल्यास विरोधक औषधालाही शिल्लक राहणार नाहीत, असे वक्तव्य रुपेश पावसकर यांनी केले आहे.

    केसरकर यांच्याविरोधात लावण्यात आलेले बॅनर
    “भाई आता खराच पुरे झाला, थांबा आता..!! पाच वर्षात जसा आमका तोंड दाखवक नाय, तसे हेच्या पुढे येव नकात आता कोपरापासून हात जोडतव” अशा आशयाचा मजकूर असणारे बॅनर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात काल लावण्यात आले होते.

    वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण, परूळे, भोगवे परिसरात अज्ञाताकडून हे बॅनर लावण्यात आले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाल्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात बॅनर लावण्यात आलेत. “भाई आता खरच पुरे झाला थांबा” असे त्यांना आवाहन करण्यात आले. मालवणी बोलीभाषेतून लावण्यात आलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनले होते. हे बॅनर निवती पोलिसांनी काल दुपारी हटविले होते.