“भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करणार” मंत्री विजय वडेट्टीवार यांचं आश्वासन

    “भटक्या विमुक्त समाजास सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवुन देण्यासाठी भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करणार” असे आश्वासन इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भटके विमुक्त हक्क परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिलं आहे.

    मंत्रालयातील परिषद सभागृहात भटके विमुक्त हक्क परिषदेच्या राज्यातील सदस्यांची बैठक विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता,महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर देखील उपस्थित होते.

    भटके विमुक्त जाती- जमांतीचे अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी या समाजाचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण घरोघरी जावून होणे गरजेचे आहे. त्यामुळे केंद्रीय सामाजिक न्याय विभागाकडून सर्व राज्यांच्या मुख्य सचिवाना निर्देशित केलेल्या सुचनांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

    दरम्यान, देशात राजस्थान व हरियाणा या दोन राज्यांनी लोकसंख्येवर आधारित असे सर्वेक्षण केले आहे. याची माहिती विभागाने घेवून या सर्वेक्षणासाठी लागणा-या बाबींचा अंदाजपत्रकात समावेश करून तसा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवून या विभागाने निधी उपलब्ध करून घ्यावा अशा सूचनाही मंत्री वडेट्टीवार यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाला दिल्या आहेत.