‘हवा’ करण्यासाठी पिस्तूल बाळगणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात; कात्रज परिसरात कारवाई

राहत्या परिसरात व समाजात प्रभाव पाडण्यासाठी बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला कात्रज परिसरात पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल व तीन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

    पुणे : राहत्या परिसरात व समाजात प्रभाव पाडण्यासाठी बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला कात्रज परिसरात पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल व तीन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

    पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी पराजे-वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद झिने, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, सचिन सरपाले, मंगेश पवार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

    मुलगा कात्रज भागात राहायला आहे. त्याची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. मुलावर यापूर्वी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. अल्पवयीन मुलाने एकाकडून पिस्तूल घेतले होते. राहता परिसर व समाजात प्रभाव पाडण्यासाठी त्याने हे पिस्तूल घेतले होते. तो पिस्तूल घेऊन फिरत होता.

    मुलगा कात्रज तलाव भागात थांबला होता. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी विक्रम सावंत, राहुल तांबे यांना मिळाली. त्यानूसार, पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. त्याच्याकडून पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली.