अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायास भाग पाडले, 15 दिवस डांबून ठेवल्याचे उघड; दाम्पत्यावर गुन्हा

पुण्यातील कात्रज भागात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, वडिलांच्या आजारपणासाठी शेजारच्या महिलेकडून 30 हजार रुपये हात-उसने घेतल्यानंतर ते परत न देऊ शकल्याने शेजारच्या दाम्पत्याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला डांबून ठेवत तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याचे समाेर आले आहे.

  पुणे : पुण्यातील कात्रज भागात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, वडिलांच्या आजारपणासाठी शेजारच्या महिलेकडून 30 हजार रुपये हात-उसने घेतल्यानंतर ते परत न देऊ शकल्याने शेजारच्या दाम्पत्याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला डांबून ठेवत तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याचे समाेर आले आहे.

  याप्रकरणी पोलिसांनी पूनम आकाश माने (वय 22, रा. कात्रज) हिला अटक करण्यात आली असून, तिचा पती आकाश सुरेश माने (वय 24) फरार झाला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात 17 वर्षीय पिडीत मुलीने तक्रार दिली आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2023 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घडला आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पिडीत मुलगी आणि आरोपी दाम्पत्य विश्रांतवाडी परिसरात एकाच भागात राहत होते. त्यामुळे पिडीत मुलगी त्यांना ओळखत होती. दरम्यान, पिडीत मुलीच्या वडिलांना दारूचे व्यसन होते. त्यातच ते आजारी पडले होते. त्यांच्यावर उपचाराची गरज होती. त्यामुळे पिडीत मुलीने आर्थिक अडचणीमुळे दाम्पत्याकडे पैशांची मागणी केली. त्यांनी मुलीला 30 हजार रुपये दिले.

  दरम्यान, मुलीला हे पैसे परत देण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे या दाम्पत्याने तिला स्वत:च्या घरात डांबून ठेवले. पंधरा दिवस घरात डांबून ठेवल्यानंतर आरोपी आकाश याने पिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार केले. दोन वेळा तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर दाम्पत्याने तिला कुठूनही पैसे आणून दे म्हणत तिच्याकडून वेश्या व्यावसाय करून घेतला. तिला शहरातील वेगवेगळ्या तीन लॉजवर पाठवत ग्राहकांकडून पैसे घेतल्याचे समाेर आले आहे.

  दरम्यान, याबाबतची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार राहुल तांबे यांना मिळाली. या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती देत पोलिसांनी घरातून पिडीत मुलीची सुटका करून पूनम हिला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर गुन्हा नोंद करून पूनम हिला अटक केली आहे. तर, तिचा पती पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

  पिडीत मुलीची आई कारागृहात..!

  पिडीत मुलीची आई सध्या येरवडा कारागृहात आहे. मुलीच्या आईने विश्रांतवाडी परिसरात पोटच्या मुलाचा खून केला होता. याप्रकरणी ती जेलमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.