प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देणाऱ्या आई-वडिलांसह पती, सासू, सासऱ्यांविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्तर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पंचवटी : अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देणाऱ्या आई-वडिलांसह पती, सासू, सासऱ्यांविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्तर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अल्पवयीन मुलीने एका मुलीला जन्म दिल्यानंतर हा बालविवाह (Child Marriage) उघड झाला आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, त्रंबकेश्वर तालुक्यातील एका जोडप्याने आपल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह जालना येथील एका युवकाशी लावून दिला. यासाठी दोन्ही कुटुंबाने एकमेकांच्या पसंतीने विवाह सोहळ्यास परवानगी देत म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिंडोरी रोडवरील हॉटेल साई गार्डन, म्हसरूळ येथे २७ सप्टेंबर २०२२ रोजी विवाह लावून दिला होता.

    पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याने ती प्रसूतीसाठी नाशिक येथे आपल्या आई-वडिलांकडे आली होती. यावेळी तिला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, जिल्हा रुग्णालयात तिची जन्मतारीख समोर आल्याने मुलीचा बालविवाह करून तिला लहान वयातच आई बनविल्याचे उघड झाल्याने याबाबत प्रशासनाने पोलिसांना माहिती देत गुन्हा दाखल केला.

    याबाबत सासरची मंडळी जालना येथील असल्याने गुन्हा जालना पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्यानंतर मुलीचे आई-वडील नाशिक तालुक्यात राहणारे असल्याने गुन्हा नाशिक तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. मात्र, लग्न म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने हा गुन्हा म्हसरूळ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.