इमेज बिल्डिंगसाठी शासकीय तिजोरीतून पैशांची उधळपट्टी; आमदार रोहित पवारांचं टीकास्त्र

राज्यात अशांतता निर्माण झाली असताना लोकांना योजनांचा लाभ घरपोच देण्याच्या नावाखाली सरकार 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून इमेज बिल्डिंगसाठी शासकीय तिजोरीतून पैशांची उधळपट्टी करतंय, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली.

    मुंबई : राज्यात अशांतता निर्माण झाली असताना लोकांना योजनांचा लाभ घरपोच देण्याच्या नावाखाली सरकार ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून इमेज बिल्डिंगसाठी शासकीय तिजोरीतून पैशांची उधळपट्टी करतंय, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली. तसेच कधी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायला पाहिजे, हे सरकारला कळत नसेल तर या सरकारचे अवघड आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक आणि आवारातील वाहनांना आग लावण्याची घटना समोर आली. त्यानंतर आता बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय ‘राष्ट्रवादी भवन’ पेटवून दिले असल्याची घटना समोर आली आहे. याचपार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

    ते म्हणाले, ‘महाराष्ट्र आज जळत असताना आणि राज्यात अशांतता निर्माण झाली असताना लोकांना योजनांचा लाभ घरपोच देण्याच्या नावाखाली सरकार ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून इमेज बिल्डिंगसाठी शासकीय तिजोरीतून पैशांची उधळपट्टी करत आहे. अशा परिस्थितीत ज्या गोष्टीसाठी आज लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले आहेत. ते त्यांना न देता सरकार इतरत्र टाईमपास करत आहे’.

    दरम्यान, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला मराठा समाजातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. तसेच काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं आहे.