तुम्ही पाळणाघरात मुलांना सोडून जाताय का?, ‘हे’ ऐकून थक्क व्हाल; डोंबिवलीतील पाळणाघरात…

डोंबिवलीत एका पाळणाघरात चिमुकल्यांची शारीरीक आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने हे प्रकरण उघडकीस आणले आहे.

    डोंबिवली / अमजद खान : डोंबिवलीत एका पाळणाघरात चिमुकल्यांची शारीरीक आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने हे प्रकरण उघडकीस आणले आहे. आधी डोंबिवली रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. नंतर पाळणाघर चालविणाऱ्या दाम्पत्यासह त्याठिकाणी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. व्हिडिओत लहान मुलांना बांधून ठेवणे, त्यांना उलटे करणे. त्यांना मारहाण करुन भिती दाखविणे हे धक्कादायक प्रकार त्या व्हिडिओत दिसत आहेत.

    डोंबिवलीत हॅप्पी किड्स डे केअर हे पाळणाघर आहे. डोंबिवलीत राहणारे मंदार ओगले आणि त्यांची पत्नी अनुजा हे त्यांची तीन वर्षाची मुलगी गार्गीसोबत राहतात. मंदार हे सरकारी गाडी चालक आहेत. त्यांची पत्नी अनुजा ही एका खाजगी कंपनीत कामाला आहे. दोघेही सकाळी सात ते रात्री आठ वेळेत कामावर जात असल्याने ते त्यांची तीन वर्षांची मुलगी गार्गी हिला हॅप्पी किड्स डे केअर पाळणाघरात ठेवतात. मंदार यांना शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी कविता गावंड यांनी सांगितले की, ज्या पाळणाघरात तुम्ही तुमच्या मुलीला ठेवतात. त्या मुलीसोबत काय प्रकार घडतो. त्याचा व्हिडिओ आमच्या हाती आला आहे. तात्काळ मंदार यांनी कविता गावंड यांच्याशी संपर्क साधला. शिवसेना महिला पदाधिकारी यांच्यासोबत मंदार आणि अन्य पालकांनी रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

    पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली. ‘आधी चाईल्ड वेल्फेअर कमिटीला जाऊन तक्रार द्या, नंतर पाहू’, असे सांगितले. तक्रार दाखल करुन घेतली नसल्याने हे प्रकरण सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांच्याकडे आले. या प्रकरणी तात्काळ तक्रार दाखल करुन घेण्याचे आदेश रामनगर पोलिसांना दिले. पोलिसांनी पाळणाघर चालविणाऱ्या गणेश प्रभूणे, त्यांची पत्नी आरती प्रभूणे आणि त्याठिकाणी काम करणारी राधा नाखरे हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

    हे प्रकरण साधना सामंत या महिलेच्या पुढाकाराने समोर आले आहे. साधना सामंत ही महिला १ मार्चला या पाळणाघरात कामाला लागली होती. मुलांसोबत होत असलेला प्रकार पाहून ती व्यथित झाली. तिने पाळणाघरात काम न करण्याचे ठरविले. तसेच हा प्रकार मुलांच्या पालकांपर्यंत कसा पोहचेल, याची सुरुवात केली.