आरक्षणाच्या नावाखाली भाजपकडून दिशाभूल  ; आ. नाना पटोले यांचे टीकास्त्र

इस्लामपुरात ओबीसी काँग्रेसचा मेळावा

  इस्लामपूर : लोकशाही संपवण्याचे काम भाजप सरकार करत आहेत. आरक्षणाच्या नावाखाली बलुतेदार, धनगर, मराठयांना भाजप खेळवतेय. छत्रपती शिवाजी महाराजांनी बाराबलुतेदारांना घेवून स्वराज्य उभारले. शिवरायांचे नाव घेत सत्ता मिळवायची आणि बलुतेदारांवार अन्याय करण्याचे काम हे सरकार करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा बलुतेदारांचा महाराष्ट्र उभा करण्यासाठी काँग्रेसला साथ द्यावी, असे आवाहन काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केले.
  इस्लामपूर येथे काँग्रेस ओबीसीच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, ओबीसी अध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार, तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे, विजय पवार, महिला प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. मनिषा रोटे, रंजना माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

  आमदार पटोले म्हणाले, बलुतेदारांवार अन्याय करणे, सार्वजनिक उपक्रम खासगी करणे, भेटेल त्यांना आरक्षणाचे अमिष दाखवत पक्षात घेणे असा धंदे करत भाजप करत आहे. भाजपला आरक्षण संपवायचे आहे. याचे रक्षण फक्त काँग्रेसच करू शकते. हे येडयागाबाळ्याचे काम नाही. राज्यात दर दहा वर्षांनी जनगणना होत असते. २०२१ ची जनगणना भाजपने केलेली नाही. जनगणना केल्यास प्रत्येक समाजाची स्थिती समजून येईल.

  विशाल पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यात १९९९ पर्यंत काँग्रेसचा झेंडा होता. मात्र त्यानंतर हा पक्ष शिस्तीत संपवण्याचा प्रयत्न केला गेला. या तालुक्यात काँग्रेसवर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. मात्र ते दबावाला घाबरत आहेत. वसंतदादा हे कार्यकर्त्यांची जात विचारत नव्हते. त्यांनी कार्यकर्त्यांना कमीपणा जाणवून दिला नाही. देश वाचवायचा असेल तर काँग्रेसला निवडून आणावे लागेल.

  पृथ्वीराज पाटील म्हणाले, ओबीसी बद्दल भाजपचे प्रेम असते तर समाजाचे मागासलेपण दर्शवणारा डाटा लपवून ठेवला असता का? हा प्रश्न उपस्थित केला. यावेळी जितेंद्र पाटील, आशिष कोरी, करिम मिस्त्री, सुभाष खोत यांची भाषणे झाली. कार्यक्रमास शाकीर तांबोळी, अजित भांबुरे, अ‍ॅड. विजय खरात,  संदिप मोहिते, संदीप परीट, विनायक तांदळे आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. सलमान आवटी यांनी आभार  मानले.

  तालुक्यात वसंतदादांवर प्रेम करणारी लोक आहेत. परंतू दबावामुळे बाहेर पडत नाहीत. त्यांना ताकद देण्याची गरज आहे. नाना पाटोले सारखा नेता लाभल्याने ओबीसी समाज काँग्रेसकडे वळला आहे. देशात काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी हा समाज महत्वपूर्ण भूमिका बजावेल.

  नंदकुमार कुंभार, प्रदेश सरचिटणीस, काँग्रेस ओबीसी सेल

  कार्यालयाकडे पहा
  इस्लामपूर शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाची जागा काँग्रेस पक्षाच्या नावावर आहे. जितेंद्र पाटील व बाळासाहेब पाटील यांनी लक्ष देवून ते ताब्यात घ्यावे  अशी मागणी  भानूदास माळी यांनी सभेत केली.

  यापेक्षा शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी काम करूया..
  शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा घोषणेवेळी आ. जयंत पाटील ढसाढसा रडले. मात्र त्याचवेळी अवतीभोवती असणारे त्याचे सहकारी हसत होते. आ. जयंत पाटील यांच्या सारखा सुसंस्कृत नेता रडत असताना त्यांच्या सहकाऱ्यांनी हसून अपमान करणे हे कितपत योग्य ? असा सवाल भानुदास माळी यांनी केला. यावर आमदार पटोले म्हणाले, कोण कोणासाठी अश्रू ढाळतो यापेक्षा शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी काम करूया.