स्टॉक रजिस्टर गायब; चाैघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मागील दोन वर्षांतील साहित्य खरेदीसह सर्वच स्टॉक रजिस्टरचं गायब असल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने माजी उद्यान अधीक्षक निशिकांत कांबळे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश महानगर पालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी दिले आहेत.

  सोलापूर : मागील दोन वर्षांतील साहित्य खरेदीसह सर्वच स्टॉक रजिस्टरचं गायब असल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने माजी उद्यान अधीक्षक निशिकांत कांबळे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश महानगर पालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी दिले आहेत.

  महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी पदभार घेतल्यापासून महापालिकेतील कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. आयुक्तांनी भ्रष्टाचार करणाऱ्या आणि निकृष्ट रस्ते कामांबाबतही अनेक अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागात मागील दोन वर्षांतील साहित्य खरेदीसह सर्वच रेकॉर्ड सापडत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने आयुक्तांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

  वर्कऑर्डर मिळालेली नसतानाही नुकतेच होम मैदान येथे पार्किंगच्या मक्तेदाराने वाहनधारकांकडून वसूली सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी भूमी व मालमत्ता विभागातील दोषी कर्मचाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर शहरातील पथदिव्यांवर जाहिरातीचे फलक लावण्या संदर्भातील टेंडर प्रस्ताव तीन महिने उशीराने पाठविल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंता विक्रम पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिल्याचे आयुक्तांनी सांगितले. संपकरी कर्मचाऱ्यांना नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. कामावर उपस्थित न राहता पुर्ण पगार कसा काढला जातो ? याची तपासणी करण्यात येणार असल्याचे आयुक्त शिवशंकर म्हणाले.

  आंदाेलनाला ट्रेड युनियनचा विरोध

  पालिका आयुक्तांच्या बदलीसाठी कामगार संघटनांनी गुरुवारी आंदोलन केले. या आंदोलनाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनने विरोध केला. बापूसाहेब सदाफुले म्हणाले, कामगार कृती समिती सोयीच्या विषयावर आंदोलन करते. आयुक्त पी. शिवशंकर यांनी पालिकेतील ४६९ रोजंदारी कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध करूनही शासनाकडे पाठविली. कामगारांसाठी पाच लाख रुपयांचा कॅशलेस विमा सुरू केला.

  एकीकडे माेर्चा, दुसरीकडे सत्कार

  शुक्रवारी माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त पी शिवशंकर स्तुती करत त्यांचा सत्कार केला. मोर्चात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई करू नका, पण जे कर्मचारी आगाऊ आहेत त्यांच्यावर कारवाई करा. सरसकट कारवाईस विरोध करत माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी यांच्यासह सुमारे २५ जणांनी आयुक्तांचा सत्कार केला. एकीकडे आयुक्ताचे विरोधात मोर्चा तर दुसरीकडे महापालिका आयुक्त सत्कार असा प्रसंग महापालिकेत पहावयास मिळाला आहे.

  ऑनलाइन हजेरी, ऑनलाइन सेवांमुळे नागरिकांचे काम कोण करते, कोण करीत नाही याची माहिती मिळते. कामगार कृती समितीने शहरातील नागरिकांचे हित पाहिले पाहिजे. आयुक्तांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आमचा पाठिंबा नसल्याचे जाहीर केले आहे.
  बापूसाहेब सदाफुले