माळेगाव कारखान्याला विरोध करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर; बाळासाहेब तावरे यांचा आरोप

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या क्षेत्रात दहा गावे जोडण्याच्या निर्णयाशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा काडीचा संबंध नाही. मात्र, विरोधक पवारांच्या नावाने बिनबुडाचे आरोप करून कारखान्याचे नाव बदनाम करीत आहेत. मुळात कारखान्याचा कारभार चांगला चालला आहे. पण राज्यातल्या सत्ता बदलानंतर माळेगाव कारखान्याच्या विरोधकांना बळकटी मिळाली आहे, त्यामुळे बेछुट आरोप करत आहेत.

  माळेगाव – माळेगावच्या कार्यक्षेत्रात सोमेश्वर कारखान्याची दहा गावे घेण्याचा ठराव सर्वसाधारण सभेने बहुमताने मंजूर केला आहे, मात्र ही बाब विरोधकांना मान्य नाही. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर विरोधकांना बळकटी मिळाली आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करत यंत्रणेवर दबाव आणण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे, असा आरोप माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष सागर जाधव आणि संचालक मंडळाने केला आहे.

  सोमेश्वर कारखान्याच्या ४५ सभासदांनी ‘माळेगाव’ च्या कार्यक्षेत्रात येण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय दाखल केलेली याचिका फेटाळल्यानंतर कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे आणि चंद्रराव तावरे यांच्यासह विरोधी गटाने पत्रकार परिषद घेऊन कारखान्याच्या कारभा-यांवर टीका केली होती. त्याला आज कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे आणि संचालक मंडळाने प्रत्युत्तर दिले. तावरे म्हणाले, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या क्षेत्रात दहा गावे जोडण्याच्या निर्णयाशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा काडीचा संबंध नाही. मात्र, विरोधक पवारांच्या नावाने बिनबुडाचे आरोप करून कारखान्याचे नाव बदनाम करीत आहेत. मुळात कारखान्याचा कारभार चांगला चालला आहे. पण राज्यातल्या सत्ता बदलानंतर माळेगाव कारखान्याच्या विरोधकांना बळकटी मिळाली आहे, त्यामुळे बेछुट आरोप करत आहेत. मुळात जिरायती भागातील वीस गावे सोडण्याचा निर्णय सोमेश्वर कारखान्याने घेतल्यानंतर माळेगाव कारखान्याला या गावातून जवळपास 75 हजार टन ऊस उपलब्ध होईल त्यामुळे कारखान्याच्या गाळपाला मदत होईल, त्यासाठी कार्यक्षेत्रात या गावांचा समावेश करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत होतो. सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर देखील यंत्रणेवर दबाव आणून हा निर्णय हाणून पाडला. मुंबई उच्च न्यायालयाने सोमेश्वर च्या सभासदांची याचिका फेटाळली. मात्र, आमच्यापर्यंत याची काहीच माहिती नाही.

  ‘माळेगाव’ एफआरपी पेक्षा जास्त पैसे देणार..

  माळेगाव कारखान्याचे एफआरपी बद्दल बोलताना अध्यक्ष तावरे म्हणाले की, सभासदांना पंधरा दिवसात एफआरपी दिलीच पाहिजे. अजूनही कोल्हापूर झोन सोडला तर इतर जिल्ह्यामधील कारखान्यांनी एफआरपी जाहीर केली नाही. एफआरपीच्या संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या धोरणांमध्ये समन्वय नसल्याने निर्णय घेता येत नाही. मात्र, माळेगाव कारखान्याच्या सभासदांना जास्तीत जास्त एफआरपी कशी देता येईल याचा विचार संचालक मंडळ करीत आहे. मागील काही हंगामात एफआरपी पेक्षा जास्त रक्कम सभासदांना देण्याचा प्रयत्न केला आहे ही वस्तुस्थिती आहे. एफआरपी बाबत जे धोरण ठरेल त्यापेक्षा माळेगावच्या सभासदांना जास्तीचे पैसे देण्यास आम्ही बांधील आहोत.

  केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कोठ्यानुसार उच्चांकी दराने साखर विक्री..

  साखर निर्यातीबाबत विरोधक संचालक मंडळावर सातत्याने आरोप करीत आहेत. पण आम्ही कारखान्याचे नुकसान होईल अशा पद्धतीने साखर विक्री केलेली नाही. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निर्यात धोरणाप्रमाणे माळेगावने साखर निर्यातीचे धोरण राबविले आहे. यंदा महाराष्ट्राला कोठा कमी आला त्यामुळे सर्वच कारखान्यांनी साखर विक्रीची लगबग केली होती. अनेक कारखान्यांनी साखरेचे करार केले होते. महाराष्ट्राला साखरेचा कोटा कमी असताना, साखरेच्या दरात चढ उतार होत असताना देखील ७ ऑक्टोबरला संचालक मंडळाने ३४८० उच्चांकी दराने साखर विक्री केली आहे. त्यानंतर साखरेच्या दरात ३८०० रुपयांपर्यंत वाढ होत असल्याने सौदा केलेले टेंडर देखील संचालक मंडळाने थांबवले आहे. विरोधक आता आमच्या मागणीने सौदे थांबविल्याचा दावा करीत आहेत. मात्र, संचालक मंडळाने हा निर्णय आधीच घेतलेला होता.

  ऊस तोडणी यंत्रणे बाबतचा विरोधकांचा आरोप बिनबुडाचा..

  तोडणी वाहतुकीची यंत्रणा कमी गाळप क्षमतेवर परिणाम झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना बाळासाहेब तावरे म्हणाले, यंदा सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी यंत्रणेवर ताण आला आहे, तरीदेखील माळेगाव कारखान्याने स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सध्या प्रतिदिनी 9000 टनाचे गाळप केले जात आहे. करार करून देखील ऊस तोडणी यंत्रणा कार्यक्षेत्रात पोहोचली नाही. त्या मुकादम वर कारवाई सुरू आहे त्यांच्याकडून वसुली करण्यात येत आहे. एकूणच कारखान्याचा कारभार चांगला चालला आहे. मात्र, त्याला अडीच वर्षानंतर जाग्या झालेल्या विरोधकांकडून गालबोट लावले जात आहे.

  यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सागर जाधव, मदन नाना देवकाते, तानाजीराव कोकरे, योगेश जगताप, स्वप्निल जगताप, अनिल तावरे, तानाजी देवकाते, मंगेश जगताप, बन्सीलाल आटोळे, पोपटराव बुरुंगले,दत्तात्रेय येळे, रवींद्र थोरात आदी उपस्थित होते.