आमदार अनिल बाबर हे एकनाथ शिंदे यांच्या कळपात ?

राज्यातील महाविकास आघाडी सरकार मध्ये विधानपरिषदेच्या निवडणूकीतून अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. विशेषतः शिवसेनेचे नेते , नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे दिसून आले. रात्री पासून त्यांचा व समर्थक आमदारांचा फोन नाॅटरिचेबल आहे.

    विटा : राज्यातील महाविकास आघाडी सरकार मध्ये विधानपरिषदेच्या निवडणूकीतून अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. विशेषतः शिवसेनेचे नेते , नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे दिसून आले. रात्री पासून त्यांचा व समर्थक आमदारांचा फोन नाॅटरिचेबल आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आमदार अनिल बाबर ( खानापूर ) , आमदार महेश शिंदे ( कोरेगाव ) , शहाजी बापू पाटील ( सांगोला ) यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. नाराज आमदार नगरविकास मंत्री शिंदेंच्या कळपात सामील झाल्याचे लोकांमध्ये बोलले जाते.

    आमदार बाबर हे महाविकास आघाडीवर नाराज असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. खुद्द आमदार बाबर यांनीही बोलून दाखविले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीच्या पुर्वसंध्येला आमदार बाबर यांनी विट्यातील म.गांधी शाळेच्या पटांगणात झालेल्या सभेत प्रवेश केला होता. त्यावेळी सेनाप्रमुख ठाकरे यांनी बाबर यांना वजनदार पद देण्याचा शब्द भर सभेत दिला होता. त्यानंतर २०१९ च्या कार्वे च्या माळावर झालेल्या सभेत शब्द दिला. सलग दोन वेळा शिवसेनेच्या धनुष्य बाणावर आमदार झालेले बाबर हे सांगली जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. त्यांना मंत्रिपद मिळावे , अशी माफक अपेक्षा कार्यकर्त्यांची होती. मात्र ती फोल ठरली.

    गेल्या तीन वर्षात आमदार यांना पाठबल देण्याऐवजी त्यांचे राजकीय खच्चीककरण करण्याचा प्रयत्न वेळोवेळी झाला. याउलट मंत्री शिंदे यांनी पाठबल दिले. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त १०० रुग्णवाहिकेचे वितरण झाले. त्यात विटेकरांना एक रुग्णवाहिका दिली. विटा शहरात पिण्याच्या पाण्यासाठी ३२ कोटी रुपयांची योजना तात्काळ मंजूर केली. आटपाडीचे जिल्हा बॅंकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. खरंतर संयोजकांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी आग्रह धरला होता. मात्र आदित्य यांनी संयोजकांना कात्रजचा घाट दाखवला होता. या सर्व सारासार विचार करता बाबर हे सेनेपेक्षा शिंदे यांच्या गोटात अधिक रमले असल्याचे दिसून येते.

    सुहास बाबर यांचे ‘ ते ‘ सूचक विधान

    जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर चार दिवसांपूर्वी बलवडी भा. येथील एका ठिकाणी सांत्वनास आल्यानंतर शेजारी पतसंस्था कार्यालयाला भेट दिली. दरम्यान, कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका संदर्भात खोदून विचारले. त्यावेळी श्री. बाबर यांनी २० तारखेनंतर पुढील दिशा ठरूया. असे उदगार उच्चारले होते. त्यांच्या वाक्यात बरेच काही दडले असल्याचे स्पष्ट होत आहे. सुहास यांच्या ‘ त्या ‘ वाक्याची येरळाकाठावर चर्चा सुरू आहे.‌