बच्चू कडूंनी अखेर ‘त्या’ विधानावर मागितली माफी; म्हणाले…

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session 2023) प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर भाष्य केले होते. त्यादरम्यान त्यांनी आसाममधील लोकं कुत्रे खातात असे विधान केले होते.

मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session 2023) प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर भाष्य केले होते. त्यादरम्यान त्यांनी आसाममधील लोकं कुत्रे खातात असे विधान केले होते. त्यांच्या विधानानंतर आसाममधील नेतेमंडळी आक्रमक झाली असून, त्यांनी विधानसभेत गोंधळ घातला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांच्या या विधानावरून अखेर माफी मागितली आहे.

बच्चू कडू यांनी आसाममधील लोकं कुत्रे खातात असे म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर आसाममधील विधानसभेत जोरदार गोंधळ झाला. तसेच बच्चू कडूंच्या अटकेची मागणीही केली जात होती. कडू यांच्या वक्तव्यावरून आसाम विधानसभेतील आमदार आक्रमक झाले होते. यामुळे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांना त्यांचं भाषणदेखील थांबवावं लागलं होतं. ‘आसाम आणि येथील लोकांबाबत इतकं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सरकार यावर शांत का?’ असा सवाल काँग्रेस आमदाराने केला होता. आसाममधील विरोधी पक्षाने चांगलाच समाचार घेतला. त्यांनी बच्चू कडूंना अटक करा, अशी मागणी केली.

दरम्यान, आसाममध्ये हे प्रकरण तापत असल्याचे समजल्यानंतर बच्चू कडू यांनी यावर माफी मागितली. त्यांनी सांगितले की, ‘नागालँडमधील लोक कुत्रे खातात. मला वाटलं आसाममधील लोक कुत्रे खातात. दोन्ही राज्ये जवळपासच आहेत. माझ्याकडून चुकून आसाम नाव घेतलं गेलं, तिथं नागालँड म्हणायला हवं होतं. एवढीच माझी चूक आहे. यामुळे त्या राज्यातील लोकांच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी माफी मागतो, असे त्यांनी म्हटले.

काय म्हणाले होते आमदार कडू?

‘महाराष्ट्रातील सर्व भटके कुत्रे आसाममध्ये पाठवा. तिथे त्यांना किंमत आहे. आसाममधील लोक कुत्र्यांचं मांस खातात. आपण जसा बोकड खातो, तसे तिकडचे लोक श्वानाचं मांस खातात. या श्वानांचा व्यापार होईल. आम्ही गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा आम्हाला याची माहिती मिळाली’, असे त्यांनी म्हटले होते.