bachchu kadu photo

बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले की, आता सर्व अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे.

    अमरावती: राज्यातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) काल सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. यावर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. येत्या 20 ते 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी प्रतिक्रिया बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिली आहे.(Maharashtra Cabinet Expansion)

    ते म्हणाले की, आता सर्व अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे. कुणाला मंत्री कराल न कराल तो नंतरचा भाग आहे. पण एका मंत्र्याकडे चार ते पाच खात्यांचा पदभार आहे. त्यामुळे गोंधळलेली अवस्था आहे. लोकांची कामं निकाली काढण्याची गरज आहे. यासाठी लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे. तसेच मला एकनाथ शिंदे यांनी मला मंत्री पद देण्याच आश्वासन दिलं होतं एकनाथ शिंदे हे शब्दाचे पक्के आहेत. ते शब्द पाळणार आहेत, असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं होतं. विधानसभा अध्यक्ष 16 आमदारांना अपात्र ठरवणार नाही, एकनाथ शिंदे यांनी कागदोपत्री यशस्वीपणे लढा जिंकला असेही विधान बच्चू कडू यांनी केलं. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार आता खरच 20 ते 21 तारखेला होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.

    न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारला दिलासा
    आमदार बच्चू कडू काल म्हणाले होते की, न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारला दिलासा मिळाला. कोणाचंही निलंबन झालेलं नाही. निलंबनाचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षाला द्यावा लागेल. हे सरकार अध्यक्षांनीच बनवलं आहे. त्यामुळे आता वेगळा निर्णय लागणार नाही.

    ऑपरेशनमध्ये चुका पण…
    ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंकडे आमदार व खासदारांची संख्या जास्त आहे. जो काही निर्णय झाला आहे तो संख्याबळावर झाला आहे. त्यामुळे हे सरकार आता अधिक मजबुतीने काम करेल. राज्यपालांचं काही चुकलं असेल. मात्र ऑपरेशनमध्ये काही चुका झाल्या तरी पेशंट वाचला हे महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं.