
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शिवसैनिक महेंद्र दिपटे (Mahendra Dipate) यांनी काही दिवसांपूर्वी बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या कानशिलात हाणल्याचा दावा केला होता. त्यानंतर मोठी खळबळ माजली होती.
अमरावती : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शिवसैनिक महेंद्र दिपटे (Mahendra Dipate) यांनी काही दिवसांपूर्वी बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या कानशिलात हाणल्याचा दावा केला होता. त्यानंतर मोठी खळबळ माजली होती. या शिवसैनिकाची अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भेट घेतली.
राणा व कडू यांच्यातील राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. त्यातच त्यांनी दिपटे यांची भेट घेतल्यामुळे भविष्यातील त्यांचे इरादे स्पष्ट झालेत. यातून आमदार रवी राणा व आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद आणखी चिघळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अंजनगाव सुर्जी शहरात 11 सप्टेंबर रोजी युवा स्वाभिमान पक्षाने दहीहंडीचे आयोजन केले होते. तिथे आमदार रवी राणा व उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक महेंद्र दिपटे यांच्यात वाद झाला. या वादात आमदार रवी राणा यांनी आपल्यावर चाकू हल्ला झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर महेंद्र दिपटे यांनी मी राणा यांच्या कानशिलात हाणल्याचे स्पष्ट केले होते.
पुन्हा राणा-कडूंमध्ये वाद?
दुसरीकडे, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षानंतर आमदार रवी राणा व आमदार बच्चू कडू यांच्यात खोक्यांवरून मोठे राजकारण रंगले होते. हा वाद मिटवण्यासाठी हायकमांडला मध्यस्थी करावी लागली होती. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी आपसातील वादाला पूर्णविराम दिला होता. पण आता बच्चू कडू यांनी राणा यांना मारहाण करणाऱ्या महेंद्र दिपटे यांची भेट घेतल्यामुळे राणा व कडू यांच्यात पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.