…अन् दुधवडे कुटुंबाला आमदार डॉ. लहामटे यांनी दिला मदतीचा हात

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील अकलापूर गावांतर्गत असलेल्या मुंजेवाडी शिवारात गुरुवारी (दि.९) दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे घराची भिंत अंगावर पडून तीनजण ठार झाले होते. तर दोनजण जखमी झाले होते. त्यानंतर आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दुधवडे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले

    संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील अकलापूर गावांतर्गत असलेल्या मुंजेवाडी शिवारात गुरुवारी (दि.९) दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे घराची भिंत अंगावर पडून तीनजण ठार झाले होते. तर दोनजण जखमी झाले होते. त्यानंतर आमदार डॉ. किरण लहामटे (Dr.Kiran Lahamate) यांनी दुधवडे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आणि त्यांच्या वारसांना शासकीय मदत म्हणून बारा लाख रूपयांचा धनादेश दिला.

    मुंजेवाडी शिवारातील तारामळीवस्ती येथे हे दुधवडे कुटुंब राहत होते. गुरूवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने घराची भिंत अंगावर पडली. त्यामध्ये विठ्ठल भिमा दुधवडे, हौसाबाई भिमा दुधवडे व साहिल सुभाष दुधवडे हे तिघेजण जागीच ठार झाले तर वनिता सुभाष दुधवडे, मंदाबाई विठ्ठल दुधवडे हे जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दुधवडे कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले.

    यावेळी त्यांच्यासमवेत माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, तहसीलदार अमोल निकम, माजी पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, राष्ट्रवादीचे मुन्ना शेख, जयहिंद युवामंचचे पठारभाग अध्यक्ष सुहास वाळुंज, विद्यार्थी काँग्रेसचे गौरव डोंगरे, शिवाजी तळेकर, पठारभाग युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब कुर्‍हाडे, सरपंच आरूण वाघ, सामाजिक कार्यकर्ते अशोक वाघ, माजी उपसरपंच संपत आभाळे, महसूल विभागाचे मंडलाधिकारी इरप्पा काळे, तलाठी सारिका जाधव, मिथुन खोंडे यांसह आदी उपस्थित होते.