खा. डॉ. सुजय विखे यांचा माफीनामा केवळ कागदावरच…

माफीनाम्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. हाती कोलीत सापडल्याने विखे यांच्या विरोधकांनी या माफीनाम्याचे भांडवल केले.

    अहमदनगर-सुहास देशपांडे : भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच कार्यकर्ता मेळाव्यात खा. डॉ. सुजय विखे यांनी मागील पाच वर्षांत झालेल्या चुकांबाबत माफीनामा सादर केला होता. मात्र त्यास आठवडा उलटल्यानंतरही एकूण परिस्थितीत फारसा फरक नसल्याचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते. त्यामुळे जाहीरपणे सादर केलेला माफीनामा फक्त कागदावरच राहणार की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

    भाजपकडून उमेदवारी मिळविण्यात डॉ. सुजय विखे पाटील यशस्वी झाले. उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मेळावा नगर शहरात घेतला. मेळाव्याची जबाबदारी स्थानिक पदाधिकारींकडे सोपवली असली तरी यंत्रणा नेहमीप्रमाणे त्यांचीच होती. मागील साडेचार वर्षांत कार्यकर्त्यांना आलेला आपला अनुभव याची जाणीव असल्याने पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी त्यावर भाष्य करणे गरजेचे होते. त्यामुळे माझा स्वभाव कसा आहे, हे सांगतानाच त्यांनी काही चुका झाल्या असतील, कुणाचे मन दुखावले गेले असेल तर माफ करावे, असे सांगून आपला माफीनामा नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर ठेवला.

    माफीनाम्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. हाती कोलीत सापडल्याने विखे यांच्या विरोधकांनी या माफीनाम्याचे भांडवल केले. नीलेश लंके यांच्या समर्थकांनी सोशल मीडियाचा वारेमाप वापर करून हा माफीनामा व्हायरल केला. विरोधक एकीकडे हे करत असताना दुसरीकडे विखे यांचे समर्थक, भाजप पदाधिकारी, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते ‘झाले गेले विसरून’ कामाला लागले. या घटनेला आठवडा उलटून गेला. मात्र आठवड्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक पडला नसल्याची भावना पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. ही भावना व्यक्त करताना त्यांच्यातील संतापही समोर येऊ लागला आहे.

    ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अबकी बार, चारसौ पार’ हा नारा दिला नसता तर कदाचित अनेकजण उन्हामध्ये बाहेर पडले नसते’ अशा शब्दात हा संताप बाहेर पडू लागला आहे. ‘मेळाव्यात सादर झालेला माफीनामा फक्त कागदावरच राहण्याची शक्यता अधिक आहे’ अशी शंकाही काहींनी व्यक्त केली.