आमदार गणेश नाईकांमुळे वाचला दुचाकीस्वारांचा जीव; पामबीचजवळ झाला होता अपघात

  नवी मुंबई : शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ ते पावणे नऊ वाजताच्या सुमारास पामबीच मार्गावर वाशीच्या दिशेने जाताना करावे गावाजवळ दोन बाईकस्वारांचा भीषण अपघात झाला. यात भरधाव बाईक चालवणारे चारही युवक गंभीर जखमी झाले. जखमी होऊन हे चारही युवक रस्त्यावर विव्हळत पडले होते. बघ्यांची गर्दी जमली असताना त्याचवेळी करावे गावातील नागरिक बद्रीनाथ तांडेल यांनी प्रसंगावधान राखत या युवकांना नागरिकांच्या साहाय्याने रस्त्याच्या कडेला नेले. बद्रीनाथ यांनी पोलिस आणि रुग्णवाहिकांना फोन केले. मात्र रुग्णवाहिकांकडून तातडीचा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र सुदैवाने बेलापूर वरून वाशीला जात असणरे माजी मंत्री गणेश नाईक यांनी अपघात पाहताच, तातडीने आरोग्य यंत्रणा हलवली आणि जखमी दुचाकीस्वारांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात केले. या तरुणांवर सध्या नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

  नेमके काय घडले?

  प्रत्यक्षदर्शी बद्रीनाथ तांडेल यांनी सांगितले की, हे दोन मोटरसायकलवर वेगात बाईक चालवत होते. त्यांची एकमेकांना धडक लागून अपघात झाला. चौघेजण रस्त्यावर छिन्न वीछिन्न अवस्थेत फेकले गेले होते. त्यांच्या दोन मोटर सायकल देखील रस्त्यातच आजूबाजूला पडल्या होत्या. त्या मोटार सायकलच्या अवस्थेवरून हे युवक किती बेदरकारपणे आणि वेगात बाईक चालवत असावेत याचा प्रत्यय पाहताक्षणी आला. तांडेल यांनी तातडीने आपली गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून केली. तांडेल यांचा मुलगा हर्षल दोघेजण त्यांच्या मदतीसाठी धावून गेले. त्यांनी दुचाकी स्वारांना उचलून रस्त्याच्या कडेला घेतले.

  इतका मोठा अपघात घडूनही अनेक वाहनचालक मदत करण्याचे दिसून आपले पाषाण हृदय दाखवत व्हिडिओ शूटिंग करत होते. यावेळी काहीजण मात्र मदतीसाठी हातभार लावण्यासाठी पुढे आले. या जखमी युवकांसह त्यांच्या उध्वस्त झालेल्या गाड्या रस्त्याच्याकडेला घेऊन नंतर ॲम्बुलन्ससाठी तांडेल आणि त्यांच्या मुलाने प्रयत्न सुरू केले. मात्र सुदैवाने बेलापूर वरुण वाशी दिशेला जात असलेले आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी हा सर्व प्रकार पाहून आपले वाहन थांबवले.

  अपघाताचे भयावह चित्र पाहत तातडीने आरोग्य आणि पोलिस यंत्रणेला फोन केले. फोर्टिस रुग्णालयाला फोन करून अतिदक्षता विभाग दक्ष ठेवण्यास सांगितले. अपोलो रुग्णालयाला फोन करून त्यांची अद्ययावत रुग्णवाहिका मागवली. खुद्द गणेश नाईक यांचा फोन गेल्यामुळे सामन्यांना दाद न देणारी सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. तातडीने अपोलो रुग्णालयाची रुग्णवाहिका आल्यावर युवकांना तिथेच मलमपट्टी करून अपोलो रुग्णालयात नेण्यात आले. तर दुसऱ्या रुग्णवाहिकेची वाट न पाहता थेट रिक्षात टाकून त्यांना जवळच्या सुश्रुषा रुग्णालयात नेण्यात येऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र तोपर्यंत गणेश नाईकयांचे निर्देश संबंधित यंत्रणेला सुरू होते. तिथेच उभे राहून आमदार नाईक यांनी युवकांना रुग्णालयात नेईपर्यंत सामाजिक भान जपत इतर राजकारण्यांसाठी आणि उपस्थित असूनही मदत न करणाऱ्यांसमोर जबाबदारीने वागण्याचा आदर्शवत रूपाचे दर्शन घडवले.

  हा अपघात झाल्यावर आम्ही तातडीने फोन केले. मात्र कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. मात्र सुदैवाने आमदार गणेश नाईक यांनी तिथून जाताना या युवकांना जी मदत केली त्याचे कौतुक करावे लागेल अनेक राजकारण्यांकडून संबंधित यंत्रणेला फोन केले जातात, नुसते आदेश दिले जातात. मात्र शेवटपर्यंत आमदार नाईक हे जागेवर उभे होते. त्यांना हवी नको ती मदत करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.त्यामुळे त्यांच्या नेतेगिरीचे नाही तर फक्त माणुसकीचे दर्शन झाले

  बद्रिनाथ तांडेल, प्रतक्षदर्शी (करावे गाव)