geeta jain in bjp

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तब्बल ४० पेक्षा अधिक आमदारांना घेऊन बंडखोरी केली आहे. त्यांच्यासोबत काही अपक्ष आमदार देखील आहेत.मात्र मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन (Geeta Jain Joins BJP) यांनी एकनाथ शिंदे सोबत न जाण्याचं ठरवलं. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

    मीरा भाईंदर : मीरा भाईंदर (Mira Bhayander) मतदारसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन (Geeta Jain Joins BJP) पुन्हा स्वगृही परतल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून राजकीय भूकंपाचे धक्के मिळाल्यानंतर गीता जैन यांनी बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तब्बल २० मिनिटे गुप्त चर्चा झाली आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.

    महाराष्ट्र राज्याचे सरकार गडगडणार असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल ४० पेक्षा अधिक आमदारांना घेऊन बंडखोरी केली आहे. त्यांच्यासोबत काही अपक्ष आमदार देखील आहेत. मात्र मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी एकनाथ शिंदे सोबत न जाण्याचं ठरवलं आणि मंगळवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होत्या. त्यामुळे जैन हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचं चित्र स्पष्ट झाले.परंतु बुधवारी सकाळी अचानक देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्या पुन्हा भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत.

    मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलावलं होतं.मुंबईत मी भेट घेतली.सकारात्मक चर्चा झाली,पुन्हा भाजपमध्ये सहभागी झाले आहे.

    - आमदार गीता जैन

    गीता जैन यांनी २०१९ च्या निवडणुकीत तत्कालीन भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवून दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर वर्षभर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचे ठरवले. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मात्र जैन यांनी एक वर्ष भाजपची शहराची सूत्र एकहाती मिळविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. दिल्लीपासून राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्या संपर्कात होत्या. मात्र त्यांची अपेक्षा पूर्ण न झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अखेर पुन्हा गीता जैन भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत.

    दोन दिवस घडलेल्या राजकीय घडामोडीने राज्यातील सेनेतील व सेना समर्थक आमदार संभ्रमात आहेत. आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांचे स्थानिक सेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यात अनेक खटके उडत असल्याचे दिसून आले. स्थानिक गटातटाच्या राजकारणामुळे सेनेत देखील जमत नसल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बैठक करून स्वगृही परतणार असल्याचे मत व्यक्त केले. मात्र थोडं थांबा असे सांगण्यात आले. परंतु मंगळवारी घडलेल्या राजकीय भूकंपाने राज्यातील सत्ता परिवर्तन होणार असे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे गीता जैन यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.