Pradhan Mantri Agriculture Irrigation Scheme completed; Jalpujan of Jihe Katapur Yojana by Prime Minister Narendraji Modi in Man taluka: MLA Jayakumar Gore

  दहिवडी : माण तालुक्याला वरदान ठरणारी जिहे कटापूर योजना पूर्ण झाली असून, कृष्णेचे पाणी माण गंगेच्या भेटीला आणले आहे. अखेर या योजनेचे पाणी अथक प्रयत्नातून आंधळी धरणात सोडण्यात यश आले आहे. येत्या १९ फेब्रुवारीला आंधळी धरणात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाणीपूजन करून योजनेचा शुभारंभ करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा क्षण माझ्या जीवनातील सुवर्णक्षण ठरणार असल्याची माहिती आमदार जलनायक आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.

  आंधळी धरणात पाणी सोडण्यात मोठे यश

  दहिवडी ता. माण येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हापरिषद सदस्य अरुण गोरे, शिवाजी शिंदे, दादासाहेब काळे, सोमनाथ भोसले युवा नेते सिद्धार्थ गुंडगे आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार गोरे म्हणाले, सुमारे पाचशे वर्षाने इतिहास बदलला गेला प्रभू रामचंद्र मंदिराचा वनवास 22 जानेवारीला संपला आणि त्याच दिवशी आंधळी धरणात पाणी सोडण्यात मोठे यश आले.

  माझ्या आमदारकीच्या कालखंडातील महत्त्वपूर्ण क्षण

  महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी जलपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे शुभ हस्ते होत आहे, हा सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा ऐतिहासिक योगायोग आहे. माणदेशी जनता व माझ्या आमदारकीच्या कालखंडातील हा महत्त्वपूर्ण क्षण आहे.

  जिहे कटापूर योजना पूर्ण

  खटाव तालुक्यातील नेर तलावापासून आंधळी धरणात पाणी सोडण्याच्या बोगद्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करून पाणी सोडले आहे. दुष्काळी भागातील जनतेला मी पाणी आणण्याचे स्वप्न दाखवले होते ती स्वप्नपूर्ती झाली आहे. जिहे कटापूर योजना पूर्ण होत असताना मला अनेक अडचणीवर मात करावी लागली. पण, ही योजना पूर्ण झाल्याचा अन पाणी आणल्याचा मला मोठा आनंद होत आहे.

  चौदा किलोमीटर लांबीचा बोगदा पूर्णत्वास

  जिहे- कटापूर योजना मार्गी लावण्यासाठी गेली चौदा वर्ष प्रयत्न करीत असल्याने नेर तलाव ते आंधळी धरणापर्यंतचा अपूर्ण असलेला चौदा किलोमीटर लांबीचा बोगदा पूर्णत्वास आला आहे. या योजनेला गेल्या बावीस वर्षापासून केवळ मान्यता होती. मात्र योजना तशी सातत्याने निधी अभावी रखडली गेली होती.

  मी पाणी आणण्याचे स्वप्न दाखवले

  मी ज्यावेळी आमदार झालो, दुष्काळी भागातील जनतेला मी पाणी आणण्याचे स्वप्न दाखवले होते त्या स्वप्न पुर्तीसाठी चौदा वर्षापासून झपाटून काम करीत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळाच्या जोरावर योजना पूर्ण करण्यात मोलाची मदत झाली.

  आता माण- खटावचा दुष्काळ निश्चितपणे हाटेल, नेर तलावातून आंधळी धरण, माणगंगा नदीमधून म्हसवड पर्यंतचे सिमेंट साखळी बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून माणगंगा नदी प्रवाहित होऊन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचेल.प्रारंभीची २८७ कोटीची असलेली ही योजना अडीच हजार कोटीकडे वाटचाल करीत आहे. यामधून वाढीव कामे करण्याचे काम सुरु आहे.

   

  नेरमधून दोन व आंधळी मधून एक उपसा सिंचन योजना आपण करतोय. नव्याने सव्वा टीएमसी पाणी मंजूर झाले असून सव्वातीन टीएमसी पाणी माण तालुक्यात येत आहे. या पाण्याच्या माध्यमातून सुमारे पस्तीस हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे परिणामी आगामी काळातील शेतकर्यांचा दुष्काळ हाटणार आहे .

  ही योजना गुरुवर्य कै.लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना या नावाने ओळखली जाते, योजना मार्गी लावण्यास तत्कालीन राज्य सरकार फार उदासीन होते. या अनुशंघाने आम्ही सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तीन वेळा भेटलो होतो. त्यावेळी मोदी साहेबांनी या योजनेच्यासंदर्भात माहिती घेतली होती, या योजनेला राज्यसरकार निधी देत नाही, मदत करीत नाही म्हणून त्यांनी “प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजने”त जिहे कटापूर योजनेचा समावेश केला.

   

  योजनेला गती देण्यासाठी तातडीने अडीचशे कोटी मंजूर करून केंद्र सरकारकडून खाली पाठवले. या उपलब्ध झालेल्या निधीमुळेच योजना पूर्णत्वास आली आहे. या योजनेचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते पाणी पूजन होऊन होत आहे, याचा आनंद संपूर्ण माणवासियांना होत असल्याची भावना आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली.