minal dalvi

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी (MLA Mahendra Dalvi Letter To Collector) यांनी अलिबागच्या लाचखाेर तहसलीदार मीनल दळवी (Meenal Dalvi) यांच्या कार्यकाळातील कामांची तसेच संबंधित फाईलींची चाैकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी डाॅ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे केली आहे.

  अलिबाग: भ्रष्टाचाराचा कळस गाठणाऱ्या अलिबागच्या (Alibaug) लाचखाेर तहसीलदार मीनल दळवी (Meenal Dalvi)  यांचे पाय आता आणखी खोलात जात असल्याचे दिसत आहे. गैरमार्गाने त्यांनी काेट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केली आहे. त्यामुळे दळवी या अलिबाग तहसीलदार पदावर कार्यकत असताना अनेक प्रकारे भ्रष्टाचार केला असण्याची शक्यता असल्याने त्यांच्या कार्यकाळात काेणत्या फाईली हातावेगळ्या झाल्या आहेत. त्या सर्व फाईलींची चाैकशी करण्याची मागणी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi Letter To Collector) यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

  मीनल दळवी यांना दाेन लाख रुपयांच्या लाच प्रकरणी ११ नोव्हेंबर राेजी नवी मुंबई विभागाच्या लाचलुचपत विभागाने ताब्यात घेऊन अटक केली हाेती. त्यांच्या साेबत दळवी यांचा एजंट राकेश चव्हाण याला देखील बेड्या ठोकण्यात आल्या हाेत्या. अलिबागच्या न्यायालयात त्यांना १२ नोव्हेंबर राेजी हजर केल्यानंतर न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांनी १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली हाेती. त्याची मुदत संपल्याने दळवी आणि चव्हाण यांना सोमवारी पुन्हा आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने दळवी आणि त्यांचा एजंट राकेश चव्हाण याला २८ नाेव्हेंबरपर्यंत न्यायालयीन काेठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.

  सर्वसामान्यांना दळवी या कामात अडवणूक करत हाेत्या. कोणतेही काम करण्यासाठी त्या ठराविक रक्कम घेत हाेत्या. आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याने नागरिकांसह वकीलांमध्येही प्रचंड नाराजीचा सूर हाेता. दळवी यांच्या कारकिर्दीला नागरिक कमालीचे हैराण झाले हाेते. याबाबत त्यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रारी केल्या हाेत्या.

  तलाठी, ग्रामपंचायत, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अन्य कार्यालयांमध्ये जनतेशी निगडीत कामे हाेत असतात. आपली कामे नियाेजित वेळेत पूर्ण व्हावीत,अशी जनतेची अपेक्षा असते. जनतेला सेवा देणारे सरकारी अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत. जनतेने भरलेल्या करातूनच त्यांचा पगार हाेताे. जनतेची कामे अडवून गैरमार्गाने पैसा कमावणाऱ्यांवर कठाेर कारवाई हाेणे गरजेचे आहे.

  - आमदार महेंद्र दळवी, अलिबाग

  दळवी यांनी नागाव येथील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी आणि अलिबाग येथील हर्षल पाटील यांच्या पेट्राेल पंपावर गाडीत पेट्राेल टाकून पैसे न देताच पळून गेल्या हाेत्या. अशी कृत्य करुन त्यांनी सरकार आणि प्रशासनाची बदनामी केली आहे, असे निवेदनात नमुद केले आहे. त्यांच्या कार्यकाळात माेठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यांनी आतापर्यंत काेणत्या फायली हात वेगळ्या केल्या आहेत. त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने कामे झाले असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी त्या सर्व कामे आणि संबंधीत फाईलींची चाैकशी हाेणे गरजेचे आहे, असे आमदार दळवी यांनी निवेदनात नमुद केले आहे.

  जिल्हाधिकाऱ्यांकडे लागले लक्ष
  अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबागच्या लाचखाेर तहसलीदार मीनल दळवी यांच्या कार्यकाळातील कामांची तसेच संबंधित फाईलींची चाैकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी डाॅ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे केली आहे. आमदार महेंद्र दळवी हे एक लाेकप्रतिनीधी आहेत. त्यामुळे कल्याणकर यांना या प्रकरणाची चौकशी करणे क्रमप्राप्त ठरत असल्याचे बाेलले जात आहे. कल्याणकर यांनी चाैकशीला हिरवा कंदली दिल्यास दळवी यांनी आतापर्यंत काेणती गैरकृत्य केली आहेत. हे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेच्या हितासाठी जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर हे खरंच या प्रकरणाची चौकशी करणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. डाॅ. कल्याणकर यांनी चाैकशी लावल्यास जिल्हा प्रशासन देखील अशा नियमबाह्य कामांना पाठीशी घालत नाही, असा संदेश सर्वसामान्यांपर्यंत जाण्यास मदतच मिळणार आहे.