दहावी- बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते सत्कार

स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री इंग्लिश मीडियम मोशी, गायत्री इंटरनॅशनल स्कूल व जूनियर कॉलेज च-होली बुद्रुक, मंजुरीबाई विद्यालय दिघी यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्षे २०२१ - २२ मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात उत्साहात करण्यात आला.

    आळंदी : स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री इंग्लिश मीडियम मोशी, गायत्री इंटरनॅशनल स्कूल व जूनियर कॉलेज च-होली बुद्रुक, मंजुरीबाई विद्यालय दिघी यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्षे २०२१ – २२ मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात उत्साहात करण्यात आला.

    या प्रसंगी भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे, प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, मुख्याध्यापक हनुमंत कुबडे, मुख्याध्यापक रामदास थिटे उपस्थित होते. गुणगौरव समारंभास गणेशवंदना ने सुरूवात करण्यात आली. या सोहळ्यात दहावी – बारावी परीक्षेत विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्वच शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

    याप्रसंगी आमदार महेशदादा लांडगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत मार्गदर्शन केले. प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या संधी सांगत प्रशासकीय सेवेमध्येही प्रवेश करावा असे आवाहन केले. मुख्याध्यापक हनुमंत कुबडे व रामदास थिटे यांनीही विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. संस्थाध्यक्ष विनायक भोंगाळे म्हणाले की, सध्याच्या स्पर्धेच्या युगात स्पर्धेचे घोडे होण्याऐवजी आपण स्वतःशीच स्पर्धा करावी व आत्मचिंतन करून आपला व्यक्तिमत्त्व विकास साधावा. तसेच ‘वाचाल तर वाचाल’ या संकल्पनेला पुढे ठेवून या उपक्रमा विषयीही उपस्थित पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

    यावेळी काही उत्साही पालकांनी व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळे विषयीची कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर संस्थाध्यक्ष यांच्या विचार मंथनातून व प्रेरणेतून वरील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘काव्यमंच’ चा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी निश्चितच काव्यमंच उपयोगी ठरेल असे मत संचालिका कविताताई भोंगाळे कडू पाटील यांनी व्यक्त केले.

    यावेळी संचालिका कविता भोंगाळे, सरिता भोंगाळे, संजय भोंगाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली भागवत, कार्यकारी अधिकारी काजल छतिजा तसेच सर्व शाखेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. भरत बारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कामिनी चव्हाण यांनी आभार मानले.