आमदार महेश शिंदे यांच्याकडे कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी

राज्यातील शिवसेना-भाजप महायुती सरकारच्या स्थापनेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांना राज्य सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त केले आहे. दरम्यान आपल्या निवडीनंतर आमदार महेश शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असणारे जलसंधारणाचे काम केले जाईल.

  कोरेगाव : राज्यातील शिवसेना-भाजप महायुती सरकारच्या स्थापनेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांना राज्य सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त केले आहे. दरम्यान आपल्या निवडीनंतर आमदार महेश शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असणारे जलसंधारणाचे काम केले जाईल. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला न्याय देणार असल्याची ग्वाही दिली आहे. आमदार शिंदे यांची निवड झाल्याचे वृत्त समजताच मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहरासह सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी आमदार महेश शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.

  मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार महेश शिंदे यांना नवीन निवडी बद्दल शुभेच्छा दिल्या आणि पश्चिम महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले यावेळी मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.२०१९ साली कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून नेत्रदीपक विजय मिळवत आमदार झालेल्या महेश शिंदे यांनी अल्पावधीतच आपल्या कामाची चुणूक केवळ महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला दाखवून दिली होती. कोरोना सारख्या जागतिक महामारीमध्ये स्वतः कुटुंबासह घरा बाहेर पडून त्यांनी हजारो लोकांचे जीव वाचवले. कोणतीही शासकीय मदत न घेता स्वखर्चातून एक नव्हे तर पाच कोरोना सेंटर सुरू करून सर्वसामान्य लोकांचे जीव वाचवले. जीवनावश्यक वस्तूंचे किट करून मतदारसंघातील घरोघरी त्याचे वितरण केले.

  कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बहुतांशी भाग हा आवर्षण प्रवण असल्याने या भागात पाणी पोहोचले पाहिजे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाद्वारे विविध प्रकल्पांची कामे मार्गी लावली. त्यामध्ये प्रामुख्याने गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जिहे कठापूर उपसा जलसिंचन योजनेचा समावेश होतो.

  जलसंधारण, कृषी व पशुसंवर्धन या विषयांमध्ये दांडगा अभ्यास आणि काम करण्याची पद्धती पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाची जबाबदारी आमदार महेश शिंदे यांना देण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार मंगळवारी अधिकृतरित्या कॅबिनेट मंत्री पदाच्या दर्जासह उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.

  कोरेगाव विधानसभा मतदारसंघच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात समाविष्ट होणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून जलसंधारणाची कामे केली जातील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत असलेले जलसंधारणाचे काम सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण केले जाईल. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्यासाठी पावले टाकली जातील. कृष्णा खोऱ्यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवत आणि संवाद साधत कामे लवकरात लवकर पूर्ण करून घेतली जातील, अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली. सध्या पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून अत्यंत योग्य वेळी राज्य सरकारने मोठी जबाबदारी सोपविली आहे. सरकारने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत सर्वसामान्य जनतेला दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत, याची दक्षता घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आमदार महेश शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपदासह कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त केल्याची माहिती समजताच कोरेगाव शहरासह ग्रामीण भागात कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली व आमदार महेश शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
  कोरेगाव शहरात जुना मोटर स्टँडवर फटाक्याची जोरदार आतषबाजी करण्यात आली. यावेळी आमदार महेश शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिनभैय्या बर्गे, नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे, साईप्रसाद बर्गे, सागर वीरकर, सागर बर्गे, परशुराम बर्गे, राजेंद्र वैराट, मुन्नाभाई काझी, माजी नगरसेवक बच्चू शेठ ओसवाल, रशीद शेख, दीपक कांबळे, डॉ. विघ्नेश बर्गे, सागर दोशी, अनिकेत सूर्यवंशी, बाबा दुबळे, विजय घोरपडे, संतोष बर्गे, अजित विलासराव बर्गे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काटकर अजित तुपे, रत्नदीप फाळके, जवानसिंग घोरपडे, शिवसेना शहरप्रमुख महेश शामराव बर्गे, दीपक फाळके यांच्यासह आमदार महेश शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी केली. सुमारे अर्धा तास ही आतषबाजी सुरू होती.

  आमदार महेश शिंदे यांचे महत्त्व अधोरेखित

  आमदार महेश शिंदे यांचे राज्य मंत्रिमंडळात असलेले वजन, प्रचंड अभ्यासूवृत्ती आणि समाजकारणाची ओढ या त्रिसूत्रीमुळे राज्यातील एकनाथ शिंदे सरकारमधील पहिली महामंडळावरील नियुक्ती जाहीर झाली आणि ती आमदार महेश शिंदे यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला लाभली आहे. आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून कृष्णा खोरे विकास महामंडळाद्वारे पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ निवारणाचे काम प्राधान्य क्रमाने होणार आहे, त्याचा कोरेगाव विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याला होणार आहे. एकूणच आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राला न्याय मिळाला असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे.