अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट; साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ

वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार व अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे प्रमुख नेते मकरंद पाटील (Makarand Patil) यांनी बारामती येथे गोविंद बागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली.

    वाई : वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार व अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे प्रमुख नेते मकरंद पाटील (Makarand Patil) यांनी बारामती येथे गोविंद बागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचे सांगण्यात येत असले तरी या दोघांमध्ये सुमारे पाऊण तास विविध विषयांवर चर्चा झाली. या भेटीने साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

    किसन वीर साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभाच्या भाषणात आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले होते की, ”आम्ही शरद पवारांशी निष्ठा ठेऊन आहोतच. मी घेतलेली भूमिका माझ्या मतदारसंघातील काही सहकाऱ्यांना आवडली नाही. परंतु साखर कारखाना आणि मोठा मतदारसंघाच्या विकासकामांसाठी निर्णय घेतला. त्याचवेळी आमदार पाटील यांनी राजकीय तडजोडी आणि शरद पवार यांच्याशी असणाऱ्या निष्ठेबाबत भाष्य करून आपली भूमिका स्पष्ट केली होती. तरीही शरद पवार निष्ठावंत वेगवेगळी चर्चा आमदार पाटील यांच्या मतदारसंघात करत होते. त्यामुळे या भेटीने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

    याभेटीत शरद पवार यांनी आवर्जून किसन वीर कारखाना व खंडाळा कारखान्यांचे गाळप सुरु झाले का, काही अडचणी आहेत का, याची माहिती मकरंद पाटील यांच्याकडून घेतली. दरवर्षी दिवाळी पाडव्यादिवशी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते येत असतात.आमदार मकरंद पाटील दरवर्षी तिथे हजेरी लावत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरही बहुतांशी आमदारांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.