पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या दौऱ्याकडे आमदार मोनिका राजळेंची पाठ

पालकमंत्र्यांच्या स्वागत फलकावर आमदार राजळे यांचा फोटो देखील टाळण्यात आला. तालुकाध्यक्ष लोढे यांना निमंत्रणही दिले नसल्याची माहिती आहे. या प्रकाराने केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या तसेच लोकसभा व विधानसभेत प्रतिनिधीत्त्व करत असलेल्या भाजप या शिस्तबद्ध पक्षातील अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचे दिसून येते.

    शेवगाव : राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेवगाव तालुका पिक पाहणी दौऱ्यात भाजपअंतर्गत गटबाजी निदर्शनास आली. नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या दौऱ्यात आमदार मोनिका राजळे यांनी त्यांच्या समर्थकांसह पाठ फिरवल्यामुळे अनेक तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.

    मोठ्या प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे तालुक्यातील खरीप पिकासह ऊस,फळबागा यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर पाहणी करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा दौरा आज मंगळवारी (ता.२४) रोजी तालुक्याच्या पुर्व भागात आयोजित करण्यात आला. मात्र या दौऱ्यात तालुक्यातील भाजपमध्ये असणारी अंतर्गत गटबाजी उघड झाली.

    अतिवृष्टीच्या संकटात तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देऊन नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या पाहणी दौऱ्यात आमदार मोनिका राजळे यांच्यासह भाजप महाराष्ट्र किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य बापुसाहेब पाटेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, महिला अध्यक्षा आशा गरड, बोधेगाव भागातील तालुका उपाध्यक्ष कासम शेख, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन वारकड, अमोल खिळे आदी पदाधिकाऱ्यासह अनेक आमदार राजळे समर्थक अनुपस्थित होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी माजी जिल्हा परिषद नितीन काकडे यांना हाताशी धरून आमदार राजळे यांना विश्वासात न घेता पालकमत्र्यांचा दौरा आयोजीत केला.

    पालकमंत्र्यांच्या स्वागत फलकावर आमदार राजळे यांचा फोटो देखील टाळण्यात आला. तालुकाध्यक्ष लोढे यांना निमंत्रणही दिले नसल्याची माहिती आहे. या प्रकाराने केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या तसेच लोकसभा व विधानसभेत प्रतिनिधीत्त्व करत असलेल्या भाजप या शिस्तबद्ध पक्षातील अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचे दिसून येते. त्यात तालुक्यातील जिल्हाध्यक्ष मुंडे व आमदार राजळे हे दोन गट पक्षात स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यक्रमातही खुर्च्या रिकाम्या राहण्यास अंतर्गत गटबाजी हेच प्रमुख कारण असल्याची चर्चा आहे.

    बोधेगाव सेवा संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी माजी जिल्हा परीषद सदस्य नितीन काकडे यांच्या विरोधात काम केले. तसेच पुर्व भागातील आमदार राजळे यांच्या कार्यक्रमात काकडे यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना नेहमीच डावलले जाते. त्याचेच पडसाद आज या पाहणी दौऱ्यात मंत्री विखे यांना पहायला मिळाले. मात्र या गटबाजीमुळे एकमेकांच्या जिरवाजिरवीच्या नादात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जाऊ नयेत अशी भिती व्यक्त होत आहे.