महापालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात आमदार राणे, लांडगेंनी केलं आक्षेपार्ह विधान; अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं काळ्या फिती लावून कामकाज

महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात भाजपचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद महापालिका वर्तुळात उमटले. महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करत राणे यांचा निषेध व्यक्त केला.

    पुणे : महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात भाजपचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद महापालिका वर्तुळात उमटले. महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करत राणे यांचा निषेध व्यक्त केला.

    कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदीर आणि धाकटा (छोटा) शेख सल्ला दर्गा येथील अतिक्रमणाच्या विरोधात पुण्येश्वर पुर्ननिर्माण समितीने महापालिकेसमोर सोमवारी आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या वेळी आमदार राणे आणि आमदार महेश लांडगे आदी नेत्यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यावर असभ्य भाषा वापरून टीका केली होती. या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध केला.

    या आंदोलनात महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप, अभियंता संघटनेचे सुनील कदम, पुणे महापालिका एम्ल्पॉईज युनियनचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

    महापालिका भवनाच्या समोरील हिरवळीवर निषेध सभा घेण्यात आली. यावेळी प्रशांत वाघमारे म्हणाले की, पुणेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमणाच्या विरोधात काल काही संघटनांनी आंदोलन केले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र, कालच्या आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यांबाबत जी भाषा वापरली गेली ती योग्य नाही. आम्ही अनेक वर्षांपासून या शहरात अधिकारी म्हणून काम करत आहोत. शहराचा विकास एका रात्रीत झाला नाही, तर अनेक वर्षे काम केल्यावर झाल्याचे वाघमारे म्हणाले.