शीतल म्हात्रे व्हिडिओप्रकरणी आमदार सुर्वेंनी सोडलं मौन; म्हणाले, ‘मी गेल्या महिन्याच्या…’

महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यात शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यात शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यावर आता प्रकाश सुर्वे यांनी अखेर मौन सोडलं आहे. त्यांनी प्रसिद्धी पत्रक काढून त्यांची बाजू मांडली.

गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची मोठी चर्चा सुरु आहे. त्यात शीतल म्हात्रे यांनी वेळोवेळी बाजू मांडली. पण प्रकाश सुर्वे यांनी अद्याप बाजू मांडली नव्हती. त्यानंतर आज त्यांनी बाजू मांडत विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘मी गेल्या महिन्याच्या 18 ते 26 फेब्रुवारीपर्यंत प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल होतो. सध्या मला थ्रोट इंफेक्शनचा त्रास असल्याने आणि सततचा खोकला असल्याने बोलण्यास त्रास होत आहे. मात्र, गेल्या शनिवारी झालेल्या कार्यक्रमानंतर मी काही बोलत नाही, असा चुकीचा अर्थ काढून अपप्रचार केला जातो आहे’.

शीतल म्हात्रे माझ्या बहिणीसमान

लोकप्रकल्पाच्या उद्घाटनानंतर निघालेल्या मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत प्रचंड गर्दी आणि प्रचंड आवाज होता. यावेळी मला बहिणी समान असणाऱ्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे मला काही सांगत असतानाचा व्हिडिओत चुकीचे गाणे लावून मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला. महिलांचा अपमान करण्याच्या विकृत मानसिकतेमधून हा प्रकार घडल्याचं दिसून येत आहे. यातून महिलांप्रती असलेली त्यांची मानसिकता दिसून येते, असे त्यांनी म्हटले आहे.

राजकीय नैराश्य दिसते

आमदार सुर्वे म्हणाले, ‘माझ्या कामाच्या जोरावर आणि जनतेच्या प्रेमामुळेच मी दोनवेळा निवडून आलो आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या मतदारसंघात जोमाने सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या धडाक्यामुळे स्वत: राजकीय जीवनात हताश झालेले माझे विरोधक लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी व्हिडिओ मॉर्फ करून खोटे चारित्रहनन करणे अशा विकृत गोष्टी करत आहेत. यातून त्यांचे राजकीय नैराश्य दिसून येते, असेही त्यांनी सांगितले.

एसआयटीची घोषणा

दरम्यान, या कथित व्हिडिओ प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर ही मागणी मान्य करण्यात आली असून, एसआयटीमार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.