आमदार प्रताप सरनाईक यांचा निधीवाटपावरुन जितेंद्र आव्हाडांवर निशाणा; म्हणाले, “हा खोडसाळपणा…”

निवडणूकांपूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महानगर पालिकेला भेट दिली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

  ठाणे : आगामी लोकसभा निवडणूकींच्या (Lok Sabha elections 2024) पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. निवडणूकांपूर्वी आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ठाणे महानगर पालिकेला भेट दिली. यावेळी त्यांनी सूचना दिल्या असून तातडीने कामे सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.

  ठाणे महानगर पालिकेला भेट दिल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार सरनाईक म्हणाले, “पुढील आठवड्यात आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहिता लागण्याअगोदर विविध मतदार संघातील विकास कामे व्हावीत यासाठी आज आयुक्तांची भेट घेतली आहे. तातडीने सर्व काम सुरू करू असे आश्वासन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहे. अनेक महत्वाची कामे येत्या 2 दिवसांत होणार आहेत. महापालिका डबघाईला आली आहे अशा बातम्या पेरण्याचे काम विरोधक करत आहेत मात्र महापालिकेची आर्थिक परिस्थिती  सक्षम आहे,” अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप सरनाईक यांनीस दिली आहे.

  हे सर्व खोडसाळपणा आहे

  तसेच शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना व विरोधकांना निधीवाटपामध्ये भेदभाव केल्याचा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना आमदार सरनाईक म्हणाले, “सत्ताधारी या विरोधक हा भेदभाव मुख्यमंत्री कधीच पाळला नाही. निधीबाबत या सरकारने काहीही कमी पडू दिले नाही. जितेंद्र आव्हाड यांना देखील त्यांच्या मतदार संघात भरगोस निधी मिळाला आहे. पालिका आयुक्त संजीव जैयस्वाल जेव्हा होते तेव्हा आम्हाला निधी मिळाला नाही तेवढा निधी जितेंद्र आव्हाड यांना मिळाला तेव्हा ते मंत्री होते. आमच्या सारख्या आमदार यांना कमी निधी आणि त्यांना मोठा निधी महापालिकेकडून मिळत होता हे सर्व खोडसाळपणा आहे,” असा टोला आमदार प्रताप सरनाईक यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे.

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य

  ठाण्याच्या जागावाटपाबाबत प्रतिक्रिया देताना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दिल्लीचे वरिष्ठ घेतील. पहिला प्रश्न आहे की ठाणे ही जागा शिवसेना कि भारतीय जनता पक्ष लढणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. शिवसैनिक आणि सर्व पदाधिकारी अजूनही आग्रही आहे 2019 प्रमाणे धोरण असेल. 22 जागांपैकी एक जागा ठाणे लोकसभा या जागेवर आमचा निश्चित दावा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य आणि बंधनकारक असेल असे मत आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले.