मागाठाणेत ‘नमो चषक’ क्रीडा स्पर्धेचे आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन

क्रीडा महोत्सवातील सिद्धीविनायक केएम विरुद्ध शिवतेज हा पहिला कबड्डी सामना दरेकर यांच्या उपस्थितीत खेळवण्यात आला. सामन्याच्या सुरुवातीला दरेकर यांनी दोन्ही गटातील सर्व खेळाडूंची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.

    मुंबई : मागाठाणे विधानसभा क्षेत्रात भाजपा युवा मोर्चातर्फे फुलपाखरू उद्यान, बोरिवली पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘नमो चषक २०२४’ क्रीडा महोत्सवाचे उदघाटन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभ हस्ते शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडले.

    यावेळी उदघाटनपर भाषणात बोलताना आ. दरेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांनी सर्व क्षेत्रात पुढे यावे याकरिता सातत्याने भुमिका घेतली आहे. शिक्षणात, खेळात किंवा सर्वच क्षेत्रात असेल देशाचे भविष्य हाच आपला युवा आहे. म्हणून आज संपूर्ण देशात, राज्यभर अशा प्रकारचा ‘नमो चषक २०२४’ क्रीडा महोत्सव धूमधडाक्यात सुरू आहेत. लाखोंच्या संख्येने युवक, खेळाडू या स्पर्धेत भाग घेत आहेत. यातून आणखी चांगले खेळाडू घडावेत यासाठी तुम्हाला जे सहकार्य लागेल ते निश्चितपणे केले जाईल, असे आश्वासनही दरेकरांनी यावेळी उपस्थितांना दिले. यावेळी क्रीडा महोत्सवातील सिद्धीविनायक केएम विरुद्ध शिवतेज हा पहिला कबड्डी सामना दरेकर यांच्या उपस्थितीत खेळवण्यात आला. सामन्याच्या सुरुवातीला दरेकर यांनी दोन्ही गटातील सर्व खेळाडूंची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.

    याप्रसंगी भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, मागाठाणे विधानसभा अध्यक्ष दिलीप उपाध्याय, महिला मोर्चा अध्यक्षा रश्मी भोसले, मागाठाणे विधानसभा महामंत्री विक्रम चोगले, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमित उतेकर यांसह मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, पुरुष आणि महिला कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी उपस्थित होते.