कोकणवासीयांच्या गणेशोत्सव प्रवासावर दलालांचा ताबा, राजू पाटील यांची रेल्वे प्रशासनाकडे  मागणी

कोकण वासियांसाठी विशेष आरक्षित आणि अनारक्षित गाडया सोडून दिलासा देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केली आहे.

    कल्याण : गौरी गणपती निमित्त मुंबई सह उपनगरातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या ही लक्षणीय असते. परंतु कोकण वासियांना दरवर्षी रेल्वेने कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या तिकिटांसाठी तारेवरची कसरत करावी लागत असते. यंदा देखील एकाही रेल्वे गाडीत कोकण वासियांना तिकीट उपलब्ध होत नसल्याने कोकण वासियांची निराशा झाली आहे. त्यामुळे कोकण वासियांसाठी विशेष आरक्षित आणि अनारक्षित गाडया सोडून दिलासा देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केली आहे.

    गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र यंदाही कोकणची वाट बिकटच ठरणार आहे. गणरायाच्या आगमनाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गाड्यांची तिकीट फुल्ल झाली आहेत. त्यामुळे सध्या कोकण वासियांसमोर गावी जाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकण वासियांच्या व्यथा मनसे आमदार राजू पाटील यांनी मध्य रेल्वे व्यवस्थापकांकडे मांडल्या आहेत. दरवर्षी प्रमाणे गौरी गणपती दरम्यान सर्व गाड्या फुल्ल झाल्या असून एकही गाडीमधील प्रतीक्षा यादीत उपलब्ध तिकीट दिसून येत नाही. कोकणात गणपती उत्सवानिमित्त जाणारे बांधव तिकीट मिळावं म्हणून रात्रभर रांगेत उभे असतात. परंतु तिकिटे नाहीत कारण रेल्वे आरक्षण पूर्णपणे दलालांच्या ताब्यात गेलं आहे.

    दरवर्षी रेल्वेकडून दलालांवर कारवाई केली जाते. प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने दलालांनी सर्व रेल्वे आरक्षणावर ताबा मिळवला आहे. त्यामुळे गौरी गणपतीनिमित्त आताच नवीन विशेष गाड्यांचे नियोजन करावं असं आमदार राजू पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, दिवा, पनवेल, मुंबई सेंट्रल, वसई येथून सर्वाधिक आरक्षित आणि अनारक्षित गाडया सोडून कोकण वासियांना दिलासा देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. त्यामुळे आमदार राजू पाटील यांच्या पत्रानंतर आता रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्व कोकण वासियांच्या नजरा लागल्या आहेत.