वागळेंच्या हल्लेखोरांवर 307 गुन्हा दाखल करा; आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

पुण्याच्या कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हल्लेखोरांवर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

    पुणे : पुण्यामध्ये पुरोगामी संघटना विरुद्ध हिंदुत्ववादी संघटनांमध्ये राजकीय वादंग निर्माण झाला आहे. ‘निर्भय बनो’ या सभेला (Nirbhay Bano Sabha) भाजप (BJP) पक्षाने केलेला तीव्र विरोध आणि जेष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) यांच्या गाडीवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर विरोधक आक्रमक भूमिका घेत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी हल्लेखोरांवर कलम 307 (Section 307) अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

    ‘निर्भय बनो’ सभेला प्रमुख वक्ते म्हणून आलेल्या पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, ॲड. असिम सरोदे यांच्या गाडीवर हल्ला करत त्यांना जिवे मारण्याचा प्रकार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. या हल्लाचा आमदार रवींद्र धंगेकर यांनी तीव्र शब्दात निषेध केला. याबद्दल बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज,फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात भाजपचे कार्यकर्ते विचारवंतांवर हल्ले करत आहे. दडपशाही माजवत आहेत. त्यांच्या वाहनांवर दगडफेक करून जिवे मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही. हल्लेखोरांवर पोलिसांनी भारतीय दंड संहितेतील कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.

    तसेच पुढे  आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, “ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, ॲड. असिम सरोदे यांच्यासह त्यांच्या संरक्षणासाठी पुढे आलेले महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. हा हल्ला जीवघेणा होता. लोकशाहीत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. असे असताना स्वतःला ‘महासत्ता’ म्हणवून घेणारे भाजपचे लोक सर्वसामान्य लोक म्हणणं मांडत आहेत तर का घाबरत आहेत?” असा सवालही त्यांनी केला.

    पुण्याच्या वैचारिक, सांस्कृतिक वातावरणाला काळीमा फासणारी घटना

    “पोलिसांना हाताशी धरून आणि बहुजन समाजातील तरुणांची डोकी भडकावून भाजपने हा पूर्वनियोजित हल्ला घडवून आणला. ही पुण्याच्या वैचारिक, सांस्कृतिक वातावरणाला काळीमा फासणारी घटना भाजपने केली आहे. भाजपच्या नेत्यांनी एक चौक सांगावा तिथं विरोधक येऊन थांबतील. भाजपच्या नेत्यांनी हातात दगड घेऊन विरोधकांनी मारावीत. म्हणजे पोलीस मारणाऱ्यांवर गुन्हा दाखल करतील. पुणेकर भाजपला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाहीत,” असे मत आमदार रवींद्र धंगेकर यांनी मांडले आहे.