यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावून चालणार नाही, त्यांचे विचार आत्मसात करावे; रोहित पवारांचा टोला

भाजपसोबत सत्तेत गेलेल्यांनी यशवंतराव चव्हाण यांचा केवळ फोटो वापरुन चालणार नाही, त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे अशी टीका आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे (Ajit Pawar) नाव न घेता केली.

    पुणे : भाजपसोबत सत्तेत गेलेल्यांनी यशवंतराव चव्हाण यांचा केवळ फोटो वापरुन चालणार नाही, त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे अशी टीका आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे (Ajit Pawar) नाव न घेता केली.

    पुणे ते नागपूर या युवा संघर्ष यात्रेची माहिती आमदार पवार यांनी सोमवारी दिली. यावेळी इतर विषयावर मते मांडताना त्यांनी अजित पवार गटावर टीका केली. ‘काही लोक शरद पवार यांच्या जवळ राहायचे, त्यांचे मार्गदर्शन घ्यायचे, आज मात्र, ते विचारांशी व पवार साहेबांशी फारकत घेऊन वेगळे झाले. राजकीय पक्ष फोडण्याच्या आणि सुनावण्याच्या चर्चांना आता महाराष्ट्रातील जनता कंटाळली आहे’.

    जनतेच्या प्रश्नांकडे कोणाचे लक्ष नाही. त्यामुळे युवकांचे व जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही युवा संवाद यात्रा काढत आहोत. या यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

    हे सरकार खोटारडे

    सध्याचे सरकार एसीमध्ये बसून सरकारी अधिकारी हाताशी धरून वस्तुस्थिती लक्षात न घेता धोरण ठरवत आहे. हे सरकार खोटारडे असून, ते कोणतेही धोरण ठरवताना व्यावसायिक विचार करत आहे, असेही आमदार पवार म्हणाले.