सुनील तटकरे यांच्या ‘त्या’ टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘मी विचार जपण्यासाठी…’

'मी नेता बनण्यासाठी नव्हे तर विचार जपण्यासाठी राजकारणात आलो', असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना दिले.

    मुंबई : ‘मी नेता बनण्यासाठी नव्हे तर विचार जपण्यासाठी राजकारणात आलो’, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना दिले.

    रोहित पवार यांनी बंडखोर अजित पवार गटातील नेत्यांवर टीका करताना भाजपबरोबर गेलेत त्यांना कमळाच्या चिन्हावर लढावे लागेल, असे वक्तव्य केले होते. यानंतर अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर देत तुम्ही कितीही जन्म घेतले तरी अजित पवार होऊ शकत नाही, असा टोला लगावला होता.

    रोहित पवार अकाली प्रौढत्व आल्यासारखे वागतात. जणू जगातील आणि देशातले राजकारण एकट्यालाच कळते असा त्यांचा अविर्भाव असतो, अजित पवार हे दादा आहे त त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आलात त्यात अजित पवारांचे योगदान मोठे आहे, असे तटकरे म्हणाले होते.

    त्यावर रोहित पवार म्हणाले, अजित पवारांसारखा नेता मला व्हायचेही नाही. अजित पवार मोठे नेते आहेत. मात्र, मी नेता बनण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. मी विचार जपण्यासाठी राजकारणात आलो आहे. आम्ही विचारधारेची भूमिका घेतल्याने काही लोकांना आम्ही नेते बनतोय असे वाटतं आहे.