संजय राऊतांच्या आरोपांवर आमदार संजय शिंदे म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांना विचारा…’

महाविकास आघाडीला मतं न देणाऱ्यांची नावे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जाहीर केली आहेत. यात करमाळा आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांच्यासह सहा आमदारांचा समावेश आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय शिंदे यांनी राऊतांचे आरोप फेटाळले आहेत.

    सोलापूर : महाविकास आघाडीला मतं न देणाऱ्यांची नावे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जाहीर केली आहेत. यात करमाळा आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांच्यासह सहा आमदारांचा समावेश आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय शिंदे यांनी राऊतांचे आरोप फेटाळले आहेत.

    आमदार शिंदे म्हणाले, ‘मी घोडेबाजारात आहे का नाही हे सरकार स्थापन होत असताना मुख्यमंत्री उद्धव साहेबांना माहित आहे. मंत्रिपद सुद्धा मी नाकारलं होतं. आधी उद्धव साहेबांना विचारुन घ्या आणि मग आरोप करा’, असं प्रत्युत्तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना दिले.

    माझ्यावरील आरोप चुकीचे

    माझ्यावर संजय राऊत यांनी केलेले आरोप धादांत चुकीचे आहेत. मी घोडेबाजारातील आहे का नाही हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहित आहे. सत्ता स्थापनेच्या वेळी मला उद्धव साहेबांनी घरी बोलून काय काय ऑफर दिल्या होत्या. मी काय काय स्वीकारल्या हे विचारुन घ्या आणि मग आरोप करा, असंही ते म्हणाले.

    देसाई, सावंत यांनी कागद दिला त्याचपद्धतीने मतदान

    ‘शिवसेनेचे नेते अनिल देसाई आणि अरविंद सावंत या दोघांबरोबर जाऊन मी मतदान केलं. त्यांनी जो कागद दिला त्यापद्धतीने मतदान केलं. जर घोडेबाजार झाला असेल तर त्यांनी कालच सांगितलं असतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे मतदान केलं. आघाडी सरकार स्थापन होताना मला विमानाने नेलं, मंत्रिपदाची ऑफर दिली ते मी अजून कुठे एक्सपोज केलं नसल्याचंही आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितलं.

    संजय राऊत यांच्याकडून सहा आमदारांची नावं उघड

    हायव्होल्टेज ड्राम्यानंतर राज्यसभेच्या सहा जागांचा निकाल हाती आला. या निवडणुकीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीला मतं न देणाऱ्यांची नावं जाहीर केली आहेत. आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे, असं संजय राऊत म्हणाले.

    शब्द देऊनही मतं नाही

    काही आमदारांनी शब्द देऊ महाविकास आघाडीला मत दिलं नाही, असं राऊत यांनी सांगितलं. संजय पवार यांना मत न देणाऱ्या सहा आमदारांची नावं संजय राऊत यांनी उघड केली. यामध्ये बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षीतिज ठाकूर आणि राजेश पाटील, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे आणि मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांची नावं संजय राऊत यांनी सांगितली.