
फलटण : पक्ष फुटीची आणि फोडण्याची प्रचंड चीड सर्वसामान्यांमध्ये असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते अन्यत्र गेले तरी सर्वसामान्य माणूस खा. शरद पवार यांचेबरोबर असल्याने काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून समर्थ पर्याय उभा करून खा. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्याची ग्वाही आ. शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील चौकात उत्स्फूर्त जंगी स्वागत
बारामती येथून फलटण मार्गे दहिवडी आणि कोल्हापूर येथील कार्यक्रम व जाहीर सभेसाठी जाताना खा. शरद पवार यांचे फलटणच्या क्रांतिसिंह नाना पाटील चौकात उत्स्फूर्त जंगी स्वागत करण्यात आले, त्यावेळी ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, आ. शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, राजू निकम, फलटण तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमीरभाई शेख, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख प्रदीप झणझणे, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, समता परिषदेचे दशरथ फुले, तुकाराम गायकवाड वगैरे प्रमुख कार्यकर्त्यांसह शहर व तालुक्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकांना खा. शरद पवार यांचे नेतृत्व हवे
आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपा सरकार सत्तेवर आले तर देशात लोकशाही राहणार नसल्याचे स्पष्ट करीत सातारा जिल्हा आणि विशेषतः फलटणकरांवर खा. शरद पवार यांचे अधिक प्रेम असल्याने फलटणचे वातावरण आणखी बदलेल, असा विश्वास व्यक्त करताना आज खा. पवार यांच्या स्वागताला कोणीही नियोजन केले नसताना पक्षाच्या दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिली आहे, याचाच अर्थ काहीही झाले तरी लोकांना खा. शरद पवार यांचे नेतृत्व हवे असल्याचे आजच्या गर्दीवरून स्पष्ट झाल्याचे आ. शशिकांत शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.
संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्याबाबत विचार
आगामी लोकसभा निवडणुकीत संधी देण्याची घोषणा केल्याची आठवण देत, लोकशाहीमध्ये कोणी कोठे जावे, कोणत्या पक्षात काम करावे याचे स्वातंत्र्य सर्वांनाच असल्याने जे गेले त्यांच्याबद्दल न बोलता जे राहिले त्यांना घेऊन सर्वसामान्य जनतेच्या साथीने ३ पक्षांची एकजूट अधिक भक्कम करून लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची ग्वाही देताना कोल्हापूरनंतर सातारा येथे सभा घेण्याचे सूतोवाच करताना ३ पक्षांचे नेते एकत्र येऊन पावसाळ्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्याबाबत विचार असल्याचे आ. शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष
शेतकरी, कामगार, तरुणांमध्ये सध्याच्या केंद्र व राज्य सरकारांबाबत प्रचंड नाराजी असल्याचे निदर्शनास आणून देत भरतीनंतर कांदा, आता साखर निर्यातबंदीचा निर्णय हा शेतकरी हिताविरुद्ध असल्याचे सांगत ज्यावेळी शेतमालाला समाधानकारक दर मिळण्याची स्थिती असते त्यावेळी हे सरकार निर्यात बंदी सारखे निर्णय घेत असल्याचे आ. शशिकांत शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. नाफेड मार्फत कांदा खरेदीची घोषणा झाली मात्र कोणत्या दराने खरेदी करणार याबाबत निर्णय नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर खा. शरद पवार
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर खा. शरद पवार यांच्या विचारांचा, त्यांच्या राजकारण आणि समाजकारणाचा सतत पाठपुरावा करणाऱ्या सातारा जिल्ह्यात शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे राजकारण अखंडित सुरु राहिले पाहिजे ही सर्वसामान्यांची भावना असल्याचे नमूद करीत सन २०२४ मध्ये सत्ता बदल झाला नाही तर लोकशाही राहणार का याविषयी साशंकता असल्याने जातीयवादी आणि दंगली घडवून अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पक्षांना संधी मिळणार नाही असे सांगत २ कोटी नोकऱ्यांसारखी अनेक आश्वासने दिली मात्र त्याची पूर्तता झाली नसल्याने सर्वसामान्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे सुनील माने यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर खा. शरद पवार यांचे प्रथमच फलटण येथे येत असल्याने त्यांचे जंगी स्वागत करण्याचा निर्धार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांच्याबरोबरीने महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना यांच्यावतीने करण्यात आला होता. याबरोबरच खा. शरद पवार यांच्या स्वागतासाठी जाऊ नये यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोपही सुभाषराव शिंदे यांनी केला होता, त्यामुळे खा. पवार यांच्या स्वागतासाठी गर्दी राहणार का? याबाबत वेगवेगळी चर्चा होती.
आज (शुक्रवार) सकाळी ७.३० वाजले पासून क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे खा. शरद पवार यांना मानणारे कार्यकर्ते जमा होऊ लागले आणि त्यांच्या आगमनाची वेळ जवळ येईल तशी गर्दी वाढतच राहिली खा. शरद पवार यांच्या स्वागतासाठी सुभाषराव शिंदे यांच्यासह आ. शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, तेजस शिंदे यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, शहर व ग्रामीण भागातील शेतकरी, महिला क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते.