आमदार उदय सामंत हल्ला प्रकरण; शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

एकनाथ शिंदे गटात सामील झालेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ला प्रकरणात नगरसेवक व पुणे जिल्हा प्रमुख अशा दोघांचा न्यायालयाने अटी व शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला. शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजानन थरकुडे असे अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

    पुणे : एकनाथ शिंदे गटात सामील झालेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ला प्रकरणात नगरसेवक व पुणे जिल्हा प्रमुख अशा दोघांचा न्यायालयाने अटी व शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला. शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजानन थरकुडे असे अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

    याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, यासह इतर कलमान्वये गुन्हा नोंद आहे. दोन दिवसांपूर्वी कात्रज चौकात आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणात गुन्हा दाखल करत पोलीसांनी रात्रीत हिगोंली जिल्हा संपर्क प्रमुखासह सहा जणांना अटक केली होती. त्यांना ६ ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, फरार आरोपींचा शोध घेतला जात होता.

    यादरम्यान, माजी नगरसेवक विशाल धनवडे व जिल्हा प्रमुख गजानन थरकुडे यांनी अॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. युक्तीवाद करताना ठोंबरे यांनी याप्रकरणात कोणतीही शहानिशा न करता चुकीची कलमे लावली व त्याचे गांभीर्य वाढवत राजकीय आकसापोटी शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांवर खोटी व चुकीची कारवाईकरून गुन्ह्यात गुंतविले जात आहे. घटनास्थळी दोघेही नव्हते, असे सांगितले. न्यायालयाने दोघांचा ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.