आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास, आगामी निवडणुका शिंदेंच्याच नेतृत्वात; उदय सामंत यांचं मोठं विधान

राज्यात राष्ट्रवादीत फूट पडून ते सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे सेनेचे (Maharashtra Politics) आमदार नाराज नाहीत. आमदारांवर अन्यायही होणार नाही. याशिवाय आगामी निवडणुकासुध्दा शिंदे यांच्याच नेतृत्वात लढल्या जाऊन एकदा पुन्हा राज्यात आमचीच सत्ता येईल, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला.

    नागपूर : राज्यात राष्ट्रवादीत फूट पडून ते सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे सेनेचे (Maharashtra Politics) आमदार नाराज नाहीत. आमदारांवर अन्यायही होणार नाही. याशिवाय आगामी निवडणुकासुध्दा शिंदे यांच्याच नेतृत्वात लढल्या जाऊन एकदा पुन्हा राज्यात आमचीच सत्ता येईल, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला.

    राष्ट्रवादीच्या सहभागामुळे शिवसेनेचा आमदार अस्वस्थ आहेत. आपल्यावर अन्याय होणार असल्याची अनेक आमदार भावना व्यक्त करत आहेत. या प्रश्नावर सामंत म्हणाले, आम्ही सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन आलो आहोत. ते जे निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील. मुख्यमंत्री आमच्यावर अन्याय करणार नाही, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढल्या जाईल. लोकसभेत आम्हाला 40 पेक्षा अधिक आणि विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावाही यावेळी उदय सामंत यांनी केला.

    राष्ट्रवादीमुळे सरकार मजबूत

    अजित पवार यांच्या येण्यामुळे आमचे सरकार अधिक मजबूत झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार परिपक्व नेते आहेत. त्यांची राजकीय समज अधिक आहे. त्यामुळे ते कोणालाही नाराज करीत आणि सत्ताधाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण करतील, असे वाटत नाही.