मराठी पाट्याबाबत मनसे आक्रमक; सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली

मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर पुण्यात मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकाने, अस्थपनाच्या विरोधात आक्रमक होत त्यांनी आंदोलन केले.

  पुणे : राज्यातील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली आहे. त्यानंतर दुकानांवर मराठी पाट्या दिसल्या नाहीत, तर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर पुण्यात मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकाने, अस्थपनाच्या विरोधात आक्रमक होत त्यांनी आंदोलन केले.

  सर्वोच्च न्यायालयाने मराठी पाट्याबाबत कायद्याचे पालन सर्व दुकादारांकडून व्हावे, असे सूचित केले होते. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारकडून मराठी पाट्या न लावणाऱ्याच्या विरोधात सरकार कारवाई का करत नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच त्यांनी कारवाईची अपेक्षा केली होती. मात्र सरकारी कोणत्याच यंत्रणेने कारवाई केली नसल्याने मनसेने आक्रमक आंदोलन केले.

  मनसेच्या वतीने आंदोलन

  पुण्यातील जंगली महाराज रोडवर मनसेच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी इंग्रजी भाषेत असलेल्या दुकानांच्या पाट्यांची तोडफोड देखील करण्यात आली. यावेळी चार-पाच दुकानांवर लावण्यात आलेल्या इंग्रजी पाट्या मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्या. दरम्यान घटनास्थळी पोहचलेले पोलिस आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात झटापट झाल्याचे देखील पाहायला मिळाले. यानंतर पोलिसांनी एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे.

  पाट्या मराठीत न केलेल्यांवर कायदेशीर कारवाई करा

  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पुणे महापालिका हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापनेवरील पाट्या मराठीत न केलेल्यांवर कायदेशीर कारवाई करावी याबाबत महानगरपालिकेला मनसेकडून पत्रही देण्यात आले होते. तसेच महापालिकेने मराठी पाट्यांबाबत कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. आंदोलन करताना मनसेकडून बहुराष्ट्रीय ब्रँड दुकाने लक्ष करण्यात आली. ठराविक कंपन्या मुजोरपणे देशाचे कायदे पायदळी तुडवत असेल आणि मराठी भाषा नाकारत असतील तर त्यांना मनसे कडून आक्रमक भाषेत उत्तर मिळणार हे अपरिहार्य आहे. ज्या दुकानावर मराठी देवनागरी लिपीत पाट्या नसतील त्यांनी कायदा पाळावा. पाट्या मराठी देवनागरी लिपीत लावावेत त्यांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत केले जाईल. मात्र जो मराठी नाकारेल त्यांना मनसे दणका मिळेल, असे मनसे नेत्यांनी सांगितले.