Before Hanuman Chalisa was imposed, the police took down the horns outside the MNS office in Ghatkopar

माण तालुक्यातील दहिवडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या  दहिवडी कॉलेजचा मनमानी कारभार सुरू असून प्राचार्य सुरेश साळुंखे यांनी कॉलेजचा पदभार स्वीकारल्यापासून पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे  त्यांची सविस्तर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मनसे वतीने करण्यात आली.

  म्हसवड :  माण तालुक्यातील दहिवडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या  दहिवडी कॉलेजचा मनमानी कारभार सुरू असून प्राचार्य सुरेश साळुंखे यांनी कॉलेजचा पदभार स्वीकारल्यापासून पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे  त्यांची सविस्तर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मनसे वतीने करण्यात आली. कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी रयत शिक्षण संस्थेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा मनसेसह पालकांनी दिला आहे.  याबाबत कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

  रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेज विद्यार्थ्यांची प्रवेश फी, तसेच दाखल्याच्या नावाखाली भरमसाठ फी जमा करून कॉलेज प्रशासन गोरगरीब विद्यार्थ्यांची आणि पालकांची लूट करत आहे. महाविद्यालयात दाखले आणि प्रवेश फी संदर्भात गैरप्रकार चालू असून त्यांच्या या गैर कारभाराबाबत पालक वर्गातून तक्रारी येत आहेत. विद्यार्थ्यांना फीसाठी उशीर झाला तर विद्यार्थी आणि पालकांना विनाकारण त्रास दिला जात आहे. फी भरण्यास मुदत मागितल्यास दाखला काढून नेण्याबाबत दम देऊन विद्यार्थी आणि पालकांना अपमानित केले जात आहे.

  विविध कारणांसाठी सक्तीचे विषय देऊन वाढीव फी घेतली जात आहे. विनाअनुदानित तुकड्यांच्या नावाखाली फी घेऊनही विद्यार्थ्यांना पूर्ण क्षमतेने शिकवले जात नाही. याबाबत पालकांनी, विद्यार्थ्यांनी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारल्यास पोलीस स्टेशनला अर्ज देऊन सरकारी कामात अडथळा आणला म्हणून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी कॉलेज प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

  -धैर्यशील पाटील, जिल्हाध्यक्ष, मनसे.

  -प्राचार्यांच्या पत्नीकडनूही विद्यार्थी वेठीस
  याबाबत अधिक माहिती देताना मनसेचे जिल्हाध्यक्ष पाटील पुढे म्हणाले की,  उपप्राचार्या म्हणून त्यांच्या पत्नीची नेमणूक  झाली असल्याने त्याही त्यांच्या मनमानी कारभाराला मदत करुन विद्यार्थी व पालकांना विविध कारणांसाठी वेठीस धरत आहेत. तसेच १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून शाळा सोडल्याचा दाखल्यासाठी ६००  रुपये फी घेत आहेत. तसाच प्रकार प्रवेश फी बाबतही आहे.

  -फीसाठी विद्यार्थी-पालकांना दमदाटी
  कोणतीही शैक्षणिक संस्था संबंधित विद्यार्थ्यांसाठी फी साठी पैसे नसतील तर तीन टप्प्यामध्ये फी भरण्यासाठी नियमानुसार मुदत व सवलत दिली जाते. परंतू या शिक्षण संस्थेत प्राचार्य व उपप्राचार्या स्वतः ची मनमानी करत ‘पैसे भरा नाही तर दाखला काढून घेवून जा’ असा दम देत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

  -वाढीव तुकड्याच्या नावाखाली जादा फी वसूल
  तसेच महाराष्ट्र शासन यांच्या १९८७ च्या देणगी प्रतिबंधक कायद्यानुसार कोणतेही कॉलेज कोणत्याही विद्यार्थ्यांला जादा फी मागू शकत नाही. फी मागितल्यास व वसूल केल्यास अदखलपात्र गुन्हा जाहीर केला असून त्यासाठी कमीत कमी एक वर्ष तर जास्तीत जास्त तीन वर्षे कारावासाची कठोर शिक्षा तसेच वसुल केलेली देणगी (कॅपिटेशन फी) सव्याजासह परत मिळवून देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतू, या कॉलेजमध्ये वाढीव तुकड्याच्या नावाखाली व विविध विषयाच्या नावाखाली जादा फी घेतली जात आहे.

  कमवा व शिका या योजनेचा मूळ उद्देश बाजूला ठेवून येथील विद्यार्थीनींना प्राचार्य व उपप्राचार्या यांच्या घरी धुणी भांडी तसेच घरातील वस्त्र, साफ सफाई अशी कामे करुन घेतली जात आहेत. उपप्राचार्या यांचा केमिस्ट्री विषय असून या विषयाचा दहिवडी कॉलेज येथे आल्यापासून एकही तास तसेच प्रॅक्टीकल घेतलेले नाही.

  तरी वरील या सर्व बाबींचा विचार करुन संबंधित प्राचार्य व उपप्राचार्या यांची बदली करुन झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा येत्या आठ दिवसामध्ये कोणतीही कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. यादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित कॉलेज व प्रशासन जबाबदार राहिल अशा इशारा धैर्यशील पाटील यांनी दिला आहे.