काेतवाल आरक्षणावरून मनसे आक्रमक ; पन्हाळा तालुक्यातील पदाचे फेरआरक्षण करण्याची मागणी

पन्हाळा तालुक्यातील सात सज्जातील कोतवाल पदासाठी नुकतेच आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षण पडल्यापासुन या आरक्षणाविषयी संपुर्ण तालुक्यातून नाराजीचा सुरु उमटू लागला आहे. काही ठिकाणी चुकीचे आरक्षण पडले असून या आरक्षणाविषयी ओरड सुरु होती

  पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील सात सज्जातील कोतवाल पदासाठी नुकतेच आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षण पडल्यापासुन या आरक्षणाविषयी संपुर्ण तालुक्यातून नाराजीचा सुरु उमटू लागला आहे. काही ठिकाणी चुकीचे आरक्षण पडले असून या आरक्षणाविषयी ओरड सुरु होती. त्यातच या आरक्षणमध्ये बदल करुन फेर आरक्षण करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आदिवासी वेशात तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी फेऱआरक्षण झालेच पाहिजे, अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.

  पन्हाळा तालुक्यातील, पन्हाळा, कोतोली, कळे, आळवे, बोरपाडळे, वाघवे, देवाळे या सात सज्जातील कोतवाल पदासाठी आरक्षण टाकण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्याने बोरपाडळे या सज्जातील गावात एसबीसी आरक्षण पडणे गरजेचे होते. पण तेथे एसटी या प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. पंरतु शासन निर्देशानुसार एसटी हेच एसबीसी आहेत. याचे उदाहरण म्हणजे २०१४ व २०१७ च्या कोतवाल आरक्षण सोडतीमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. याचा गांभीर्याने विचार करुन ज्या सज्जातील आरक्षणात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्याठिकाणी फेरआरक्षण घ्यावे व लवकरात लवकर नवीन आरक्षण जाहिर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली.

  आदिवासी गाण्यावर नृत्य
  मुख्यमार्गावरुन, तारराणी मार्केट, पोलिस ठाणे अशा मार्गाने तहसिलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तहसिलदार कार्यालयात जोरदार घोषणाबाजी व आदिवासी गाण्यावर नृत्य करत या आरक्षण सोडतीचा निषेध करण्यात आला. यावेळी तहसिलदार माधवी शिंदे हजर नसल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

   कायदेशीर मार्गाने तोडगा
  शाहुवाडी-पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन या प्रकरणाची तपासणी करुन काही चुकीचे निदर्शनास अाल्यास कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्यात येईल. तहसिलदारांना आंदोलनाच्या अनुषंगाने लेखी उत्तर देण्याचे सुचना करण्यात आली, असे समीर शिंगटे यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित केल्याचे जाहिर करण्यात आले.