
मनसे आमदार राजू पाटील यांचाही फाेटो झळकला आहे. त्यामुळे या बॅनर विषयी एकच चर्चा रंगली आहे.
कल्याण : राजकारणात कोण काय करेल आणि कोण कधी कोणीची तळी उचलेल हे सांगता येत नाही. तसाच एक अजब प्रकार कल्याण ग्रामीणमध्ये समोर आला आहे. राजकीय मैत्री पक्षभेदाच्या पलिकडे असू शकते. मात्र रस्ते प्रकरणी सार्वजनिक मंत्री रविंद्र चव्हाण यांना टिकेचे लक्ष्य करणाऱ्या मनसचे पदाधिकारी चक्क त्यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर कल्याण शीळ रस्त्यावर लावल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या शुभेच्छा बॅनर वर मनसे पदाधिकारी विनोद पाटील, मनसे आमदार राजू पाटील यांचाही फाेटो झळकला आहे. त्यामुळे या बॅनर विषयी एकच चर्चा रंगली आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची रखडपट्टी झाल्याने मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला टिकेचे लक्ष केले होते. या रस्त्यावर आंदोलन करा असे मनसे सैनिकांना आवाहन केले होते. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुंबई गोवा महामार्गावर जाऊन रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष्य वेधले होते. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत मुंबई गोवा मार्गावर चर्चा सत्र घेतले. या चर्चा सत्रात चव्हाण यांनी मी कोणालीही सोडणार नाही. रस्त्याचे काम पूर्ण करणार असा अप्रत्यक्ष इशारा मनसेला दिला होता. मात्र त्यानंतरही मनसेने रस्ते रखडपट्टी प्रकरणी भाजपच्या मंत्र्यांना टार्गेट करणे सोडले नाही.
दुसरीकडे मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण ज्या मतदार संघातून निवडून आले आहेत. त्या डोंबिवलीतील शहरातील रस्ते खड्ड्यात आहेत. रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याकडे लक्ष वेधले होते. या सगळया पार्श्वभूमीवर मनसेचे काटई येथील उपसरपंच काशीनाथ पाटील यांनी मंत्री चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारा बॅनर लावला आहे. त्या बॅनरवर मंत्री चव्हाण यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे पदाधिकारी विनोद पाटील आणि विशेष म्हणजे मनसेचे आमदार राजू पाटील यांचे फोटो झळकले आहेत. एकीकडे रस्ते प्रकरणी चव्हाण यांना टिकेचे लक्ष्य करणारी मनसे आत्ता त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छांचा बॅनर लावत आहे. त्यामुळे या राजकारणात मनसेची नक्की भूमिका काय आहे याविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे.