मनसेची राज्यपालांवर टीका; राज ठाकरेंची जुनी ऑडिओ क्लिप शेअर

काल-आज आणि उद्याही हिमालयाच्या मदतीला धावून जाणाऱ्या सह्याद्रीची प्रेरणा ‘छत्रपती शिवाजीमहाराज’च होते आणि अखंड राहतील, हे हिमालयातून आलेल्या महामहिम राज्यपाल कोश्यारी यांना कळावे यासाठी ही चित्रफीत, असे मनसेने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

    मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजीमहाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या विधानानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी त्यांची पाठराखण केली. दरम्यान, मनसेनेही (MNS) राज्यपालांवर टीका केली असून ट्विटरला एक व्हिडीओ शेअर (Video Share) केला आहे. मनसेने राज ठाकरेंची एक जुनी ऑडिओ क्लिप शेअर केली असून यामध्ये त्यांनी छत्रपतींबद्दल आपले विचार मांडले आहेत.

    काल-आज आणि उद्याही हिमालयाच्या मदतीला धावून जाणाऱ्या सह्याद्रीची प्रेरणा ‘छत्रपती शिवाजीमहाराज’च होते आणि अखंड राहतील, हे हिमालयातून आलेल्या महामहिम राज्यपाल कोश्यारी यांना कळावे यासाठी ही चित्रफीत, असे मनसेने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

    ऑडिओ क्लिपमध्ये राज ठाकरे छत्रपती शिवाजीमहाराज आजही महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असल्याचे म्हटले आहे. या ऊर्जेचा स्त्रोत पाहिला तर यामागे तीन अक्षरे दडली आहेत, ती म्हणजे शिवाजी. १६८० मध्ये महाराजांचे निधन झाले आणि १६८१ ला औरंगजेब महाराष्ट्रात आला. पुढील १६८१ ते १७०७ हा २७ वर्षांचा कालखंड औरंगजेब महाराष्ट्रात होता. या काळात संभाजीराजेंचे त्यांच्याशी युद्ध झाले. ताराराणी, संताजी-धनाजी, राजाराम महाराजही होते. हे सगळे २७ वर्ष चालू होते. या काळात औरंगजेबाने पाठवलेल्या पत्रांमध्ये महाराष्ट्रात जो काही विरोध झाला, लढाया झाल्या त्याचं वर्णन ‘शिवाजी अजून मला छळतोय’ असे केले होते, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.