शिंदे गटाचे पदाधिकारी आत्ता माेजणार मनसेने बुजविलेले खड्डे, लवकरच शहर होणार खड्डेमुक्त

मनसे आमदार राजू पाटील यांच्या या आव्हानानंतर कल्याण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवले होते.

    डोंबिवली : मनसे नेते राजू पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे आवाहन केले आहे. हा चांगला उपक्रम आहे. मात्र मनसे कार्यकर्त्यांनी किती खड्डे बुजविले हे आम्ही मोजणार आहोत असे विधान शिवसेना युवा सेना पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांनी केले आहे.

    कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नाही. त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी महापालिका प्रशासनाला टिकेचे लक्ष्य केले आहे. महापालिकेने खड्डे बुजविण्याच्या कामाकरीता १८ कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहेत. त्यासाठी १३ ठिकाणी विभागून कंत्राट दिले आहे. रस्त्यावरील खड्डे १३ सप्टेंबरपूर्वी बुजविले जातील असे महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले होते. गणेश उत्सव साजरा झाला. गणेशाचे विसर्जनही काल पार पडले तरी खड्डे बुजविले गेले नाही.

    मनसे आमदार राजू पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी बॅनर न लावता त्या खर्चातून रस्त्यावरील एक तरी खड्डा बुजवावा. नागरीक मला आणि तुम्हाला आशीर्वाद देतील असे आवाहन कार्यकर्त्याना केले होते. मनसे आमदार राजू पाटील यांच्या या आव्हानानंतर कल्याण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवले होते.

    काही राजकारण्यांनी आवाहन केले होते. वाढदिवसानिमित्त बॅनर न लावता खड्डे बुजवायेच काम करा. चांगला पुढाकार होता. येत्या काळात खड्डे मुक्त रस्ते असतील. मनसेचे कार्यकर्ते खड्डे बुजवण्याचे काम करताहेत. आम्ही आत्ता मोजणार आहेत. त्यांनी किती खड्डे भरले. मी तुम्हाला सांगतो की कल्याण डोंबिवलीतील खडडे बुजविण्यासाठी आणि सिमेंट कॉंक्रिटीकरणच्या रस्त्याकरीता खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करुन आणला आहे. लवकरच शहर खड्डेमुक्त झालेले दिसेल.