‘कोरोना काळात विरप्पन गँगचा ७५ कोटींच्या कंत्राटात मोठा घोटाळा’, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याचे व्हॉट्स ॲप चॅट दाखवत मनसेचा आरोप, ईडी चौकशीची मागणी

काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचा कोरोना काळातील भ्रष्टाचार (Corruption In Corona Period) उघड करण्याचा इशारा संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिला होता. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, कोरोना काळात विशेष लोकांनाच कंत्राटे देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. मालाडमध्ये कोरोना सेंटरचं कंत्राट एका युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याला देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलय.

    मुंबई: कोरोना काळात मुंबई महापालिकेत (BMC) वीरप्पन गँगनं मोठा घोटाळा (Scam) केल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केलाय. यात युवा सेनेचे पदाधिकारी सहभागी असल्याचा आरोप करत त्यांची नावेही संदीप देशपांडे यांनी जाहीर केली आहेत. या प्रकरणात ईडी किंवा आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही देशपांडे यांनी म्हटलय. तसंच या प्रकरणाची तक्रार ईडीकडे आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे करणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय. कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिंदे गट आणि भाजपाकडून करण्यात येतोय. त्यात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेत कोरोना काळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांची चौकशीही करण्यात आलेली आहे. त्यात आता मनसेनं उडी घेतल्यानं या प्रकरणावरुन चांगलंचं राजकारण रंगण्याची शक्यता निर्माण झालीय.

    युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर काय आरोप
    काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचा कोरोना काळातील भ्रष्टाचार उघड करण्याचा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला होता. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, कोरोना काळात विशेष लोकांनाच कंत्राटे देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. मालाडमध्ये कोरोना सेंटरचं कंत्राट एका युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याला देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलय. यात कोरोना सेंटरच्या उभारणीसाठी अधिक रक्कम देण्यात आल्याचा देशपांडेंचा आरोप आहे. तसचं यात वॉर्ड अधिकारी यांचीही समान भागिदारी असल्याचा आरोप त्यांनी केलाय. युवा सेनेचे पदाधिकारी वैभव थोरात, वॉर्ड अधिकारी मकरंद दगडखैरे उर्फ महेश पाटील यांचे आपआपसात संगनमत होते, असा आरोप मनसेनं केला आहे. ज्या ठिकाणी १०० वस्तू येणं अपेक्षित होतं, त्याऐवजी ३० वस्तूच खरेदी करण्यात आल्या. इतर केवळ कागदपत्रांववर दाखवण्यात आल्याचं त्यांचं म्हणणयं. थोरात आणि या अधिकाऱ्यांतील व्हॉट्स ॲप संवादाचे स्क्रीन शॉट्सही देशपांडेंनी दाखवले.

    इतरही काही जणांची नावे असल्याचा आरोप
    या प्रकरणात ओंकार नलावडे, सुनील नलावडे, वेभव थोरात, चैत्नय बनसोड यांचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलाय. चैतन्य बनसोड यांच्या लॅपटॉपची चौकशी केल्यास घोटाळा कसा घाला, हे उघड होईल असा दावाही करण्यात आलाय. कोरोना काळात या कंपनीला ७० ते ७५ कोटींचं कंत्राट देण्यात आलं होतं.