राज्यपालांनी नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये, मनसेच्या संदीप देशपांडेची राज्यपालांवर टिका

मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढलं तर या भागात काहीच पैसा उरणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी केल्याने त्यांच्यावर आता सर्वच स्तरातून टिका होत आहे.

    मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी ( Governer Bhagat Singh) मुंबईबाबत केलंल वादग्रस्त विधान चांगलच चर्चेत आहे. त्यांच्या या विधानामुळं राज्यात राजकारणातून तीव्र राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांच्यानंतर आता मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनीही त्यांच्यावर टिका केली आहे. राज्यपालांनी नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये असं म्हणत त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

    मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढलं तर या भागात काहीच पैसा उरणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी केल्याने त्यांच्यावर आता सर्वच स्तरातून टिका होत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही त्यांच्यावर टिका केली आहे. देशपांडे म्हणाले, ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही, महाराष्ट्राचा आपल्याला इतिहास माहिती नाहीतर नको त्या गोष्टीत राज्यपालांनी आपलं नाक खुपण्याची गरज नाही. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या किंबहुना मुंबईच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा हात आहे. इथं बाकी लोक आले आणि स्वतःची प्रगती करुन घेतली. १०५ हुताम्यांमुळं मुंबई महाराष्ट्रात आली आहे. त्यामुळं ज्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती नाही तर नको त्या गोष्टीत त्यांनी नाक खुपसू नये, असं आमचं स्पष्ट मत आहे.

    काय म्हणाले राज्यपाल?

    गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी (Mumbai Financial Capital) राहणार नाही असे वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केले आहे. अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.