मनसे पदाधिकाऱ्यांकडून आदिवासी कातकरीचा छळ, पोलिसांनी केली दोघांना अटक

अशोक त्या शेळ्या चरायला नेण्याचे काम करीत होते. मात्र त्यापैकी काही शेळ्या विकल्यावर त्याचा मोबदला वाघे यांना दिला जात नव्हता. एक दिवशी ते आजारी असताना त्यांची पत्नी पालघरला गेली होती.

    कल्याण ग्रामीण : मनसेचा पदाधिकारी आणि त्याचा भाऊ हा खोणी गावातील आदिवासी कातकरी असलेल्या सहा जणांना वेठबिगारीवर राबवून घेत छळ करीत होते. आदीवासी कातकरी अशोक वाघे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे मानपाडा पोलिसांनी संजय शालीक पाटील आणि विजय शालीक पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. यापैकी संजय हा मनसेचा पदाधिकारी आणि खोणी ग्रामपंचायतीचा सदस्य आहे. या प्रकरणी राज्य स्तरीय आदिवासी विकास समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी आज खोणी गावासह कल्याणच्या प्रांत अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने सुरु आहे याचा आढावा घेतला. या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी पंडीत यांनी केली आहे.

    खोणी गावातील आदिवासी पाड्यावर राहणारे अशोक वाघे हे आदिवासी कातकरी आहेत. अशोक यांच्यासह सुनिल वाघे, सुंदरी वाघे, चांगीबाई वाघे, बेबी वाघे आणि अंकिता वाघे यांना संजय पाटील आणि विजय पाटील या दोघांना चाळ स्वरुपात घरे बांधून दिली. घरे बांधून दिल्याच्या बदल्यात संजय आणि विजय पाटील या दोघांनी या आदीवासी कातकरींना शेतीच्या कामावर आलेच पाहिजे अशी जबरदस्ती करुन त्यांना शेतीच्या कामाकरीता राबवून घेतले. शेतीच्या कामावर अशोकसह सहा जण गेले नाहीत. तर त्यांना मारहाण केली जात होती. शेतीवर काम करुन देखील त्यांना शेतमजूरी दिली जात नव्हती. दरम्यान अशोक यांना पक्षाघाताचा झटका आला आणि ते घरी होते ते पक्षाघाताने आजारी असताना देखील त्यांना सरकारी योजनेतून १४ शेळ्या विकत घेऊन दिल्या. त्या शेळ्या चरण्याकरीता जबरदस्ती केली जात होती.

    अशोक त्या शेळ्या चरायला नेण्याचे काम करीत होते. मात्र त्यापैकी काही शेळ्या विकल्यावर त्याचा मोबदला वाघे यांना दिला जात नव्हता. एक दिवशी ते आजारी असताना त्यांची पत्नी पालघरला गेली होती. त्यावेळी पाटील यांनी वाघे यांच्या घरी जाऊन त्यांना बेदम मारहाण करुन शेळ्या चरायला जाण्याकरीता जबदरस्ती केली. या आदीवासी कातकरीचा गेल्या दहा वर्षापासून अशा प्रकारे अमानुष छळ करुन त्यांना मारहाण केली जात होती. या आदीवासी कातकरी यांचे रेशन कार्ड, बँकेचे पास बुकही पाटील यांनी त्यांच्या ताब्यात ठेवले होते. या सगळया छळाला कंटाळून अशोक वाघे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी संजय आणि विजय पाटील या दोन्ही भावांना अटक केली आहे.

    या प्रकरणी राज्य स्तरीय आदिवासी विकास समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून योग्य दिशेने सुरु आहे. जागा कुणाची होती, घरे कुणी बांधून दिली. त्यांच्या नावाने मिळालेल्या शेळ्या कोणाकडे आहे. कोणत्या योजनेतून मिळाल्या कशा पद्धतीने बकेत पैसे जमा झाले हा सगळा तपासाचा भाग आहे. याची चौकशी सुरु आहे.