raju patil banner at dombivali station

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी 13 मार्च रोजी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान त्यांनी फेरीवाला प्रश्नावर आयुक्तांशी चर्चा केली होती. फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. आयुक्तांनी कारवाई करण्याचे आश्वासन आमदार पाटील यांना दिले होते.

डोंबिवली: डोंबिवली (Dombivali) स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा यासाठी मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी केडीएमसी (KDMC) आयुक्तांना भेटून पंधरा दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. आज या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे. हा अल्टीमेटम संपला आहे. मात्र फेरीवाले रस्त्यावर बसलेले दिसत आहेत. त्यामुळे आता मनसेकडून (MNS) स्टेशन परिसरात बॅनर लावण्यात आला आहे. ‘डोंबिवली स्टेशन पूर्व परिसरात फेरीवाला मुक्त करण्यासाठी डेडलाईन संपली आता आमच्याकडे दुर्लक्ष करा’, असं या बॅनरवर लिहिलं आहे. या बॅनरमुळे मनसे आता काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचे बस्तान असते. फेरीवाल्यांमुळे नागरिकांना रस्त्यावरुन चालता येत नाही. फूटपाथवरही फेरीवाले बसलेले असतात. काही दिवसांपूर्वी एका रुग्णवाहिका चालकाने रुग्णवाहिका मागे घेत असताना एका फेरीवाल्यास धक्का लागल्याने रुग्णवाहिका चालक फेरीवाल्यांकडून मारहाण झाल्याची घटना घडली होती. यापूर्वीही फेरीवाल्यांकडून कारवाई पथकावरही हल्ले झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. फेरीवाल्यांचा प्रश्न सोडविण्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे. महापालिकेकडून फेरीवाल्यांच्या विरोधात ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे फेरीवाल्यामुळे नागरिकांना होणारा त्रास सुरुच आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी 13 मार्च रोजी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान त्यांनी फेरीवाला प्रश्नावर आयुक्तांशी चर्चा केली होती. फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. आयुक्तांनी कारवाई करण्याचे आश्वासन आमदार पाटील यांना दिले होते. आमदार पाटील यांनी येत्या पंधरा दिवसात फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आमदारांनी प्रशासनाला दिलेला 15 दिवसांचा अल्टीमेटम संपला आहे. त्यामुळे आता स्टेशन परिसरात मनसे आमदा पाटील यांनी बॅनर लावला आहे. मनसेचं पुढचं पाऊल काय असेल? हे पाहावं लागेल. मनसे कार्यकर्ते फेरीवाल्यांविरोधात पुन्हा काही आंदोलन करणार की खळखट्याक होणार याविषयी चर्चा सुरु आहेत.